You are currently viewing गणेशोत्सव…सिंधुदुर्गचा..

गणेशोत्सव…सिंधुदुर्गचा..

*गणेशोत्सव…सिंधुदुर्गचा…*
*कार्यक्षम पालकमंत्री *प्रशासकीय व्यवस्था नीटनेटकी*

*विशेष संपादकीय*

गणेशोत्सव …कोकणातील कोकणी लोकांचा सर्वात आवडता, जिव्हाळ्याचा आणि प्रतिष्ठेचा सण. गरीब श्रीमंत कुणीही असो गणेशोत्सवात आपापल्यापरीने खर्च करून आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती घरी आणतात. दीड दिवसांपासून एकवीस दिवसांपर्यंत त्याची सेवा करतात आणि आपापल्या नियोजनानुसार श्री गणेशाला निरोप सुद्धा देतात. गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा होणारा कोकणातील सण परंतु, या गणेशोत्सवाला कोकणात येण्यासाठी चाकरमानी मात्र दोन दोन महिने आधीपासून रेल्वे, खाजगी बस, एस टी बस आदींची तिकीट बुक करतो. त्यावेळी मात्र कामावरून, ऑफिस मधून सुट्टी मिळेल की नाही याचा कोणीही विचार करत नाहीत. कारण कोकणातील आपल्या घरात कधी गणपती येणार याचे त्याला वेध लागलेले असतात. त्यामुळे आपण गणपतीला गावी कल्पनाच त्याला स्थिर बसू देत नाही. अनेकजण गणपतीसाठी गावी जाणाऱ्या गाडीची तिकीट मिळविण्यात यशस्वी होतात पण.., काहीजण मात्र तिकीट न मिळाल्याने हिरमुसले होतात. या सर्वांवर मात करण्यासाठी कोकणातील भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक तोडगे काढून कोकणवासीयांना आपल्या घरी पोचण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे चाकरमानी विनासायास आपापल्या वेळेत घरी पोचले.
दरवर्षीप्रमाणे कणकवली देवगड मतदारसंघाचे नेतृत्व करणारे भाजपचे नेते महाराष्ट्राचे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नाम.नितेश राणे यांनी कोकणवासीय चाकरमान्यांना गणपती सणाला घरी पोचण्यासाठी “मोदी एक्सप्रेस” नावाने मोफत प्रवासासाठी दोन रेल्वे गाड्या सोडल्याने शेकडो लोकांना कोकणात येणे सोयीस्कर झाले. यावेळी त्यांनी स्वतः रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहून गाडीला हिरवा झेंडा दाखवला होता. यावेळी चाकरमान्यांनी नितेश राणे यांचे विशेष आभार मानले. मुंबईतील विविध भागातून महाराष्ट्र शासनाच्या एस टी बसेस मधून चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी एसटी गाड्यांचे ताफेच्या ताफे सोडले आणि चाकरमान्यांना घरोघरी वेळेत पोचण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. राजकारण हा विषय बाजूला ठेवल्यास, कोकणातील चाकरमान्याला गणेशोत्सवाची ओढ लागल्याने कोणत्याही मार्गाने का होईना गावी पोचायचे असते. अशावेळी भाजपचे नेते मान.नाम. नितेश राणे पुढे सरसावले आणि रेल्वे गाड्यांची सोय करून दिली… व शिंदे शिवसेनेच्यावतीने नाम.एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात कोकणातील प्रत्येक शहर व गावागावात चाकरमान्यांना घेऊन गाड्या येत होत्या. गाड्यांवर मोठमोठी पोस्टर लावण्यात आलेली आणि दर्शनी भागावर गाडीचे गंतव्यस्थान लिहिले असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. मुख्य म्हणजे चाकरमान्यांच्या खिशाला कात्री न लागता चाकरमानी गावी पोचले. नामदार नितेश राणेंनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रेल्वेसाठी दिल्याने राणे कुटुंबीय केवळ राजकारणात पुढे नसून समाजकारणात देखील सर्वात पुढे असतात याचा दाखला दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नाम.नितेश राणे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस व जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना करून गणेशोत्सवाचे योग्य नियोजन केले होते. पालकमंत्री नितेश राणे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेऊन सर्व शासकीय विभागांना आपापसात समन्वय ठेवून सतर्क राहण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था आणि बाजारपेठेतील विक्री व्यवस्था देखील अतिशय चोख बंदोबस्तात नीटनेटकी सुरू होती. त्यामुळे वाहतूक कोंडीसारखे प्रकार घडले नाहीत आणि कोकणवासीयांना अगदी आरामात गणपती सणाचा बाजार करण्याची चांगली संधी मिळाली. मुंबई गोवा महामार्गावर देखील योग्य नियोजनामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा किंवा अपघात सुद्धा झाले नाहीत. त्यामुळे गणपती सणाला गालबोट न लागता उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. चाकरमान्यांच्या आगमनामुळे वाढणारी गर्दी व वाहनांची संख्या लक्षात घेऊन बस व रेल्वे स्थानके, महामार्ग आणि घाटांवर चोख पोलीस बंदोबस्त व अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सणापूर्वी प्रमुख रस्ते दुरुस्ती, वाहनतळ आणि इतर नागरी सुविधांना प्राधान्य देण्यात आले होते. जिल्ह्यातील प्रशासकीय व्यवस्था नीटनेटकी राहिल्याचे श्रेय नक्कीच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना जाते. कारण यातून प्रशासनावर असलेली त्यांची मजबूत पकड आणि प्रभावी निर्णय क्षमता याचे योग्य दर्शन घडले.
तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या गणेशोत्सवासाठी उसळलेली मुंबई, पुणेकर चाकरमान्यांची गर्दी आणि जिल्ह्यात असलेली वाहतूक व्यवस्था यामुळे नक्कीच हा गणेशोत्सव आठवणीत राहील. परंतु वाढलेली प्रचंड महागाई, तांदूळ, साखर, गूळ, कांदे, तेल, डाळी अशा महत्त्वाच्या वस्तूंचे वाढलेले दर थोड्याफार प्रमाणावर बाजारपेठेवर परिणाम करणारे ठरले तरी कोकणवासीयांच्या उत्साहात तसूभरही कमी आलेली दिसली नाही हेच कोकणाचे वैशिष्ट्य प्रत्येकाला अनुभवायला मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा