You are currently viewing नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था, गट, उत्पादक कंपन्यांनी महाडीबीटीवर अर्ज सादर करावेत

नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था, गट, उत्पादक कंपन्यांनी महाडीबीटीवर अर्ज सादर करावेत

नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था, गट, उत्पादक कंपन्यांनी महाडीबीटीवर अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी

कृषी औजारे बँक या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट,नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांनी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने यांनी केले आहे.

       कोकण विभागात कृषी क्षेत्राकरिता कृषी यांत्रिकीकरण हे फार महत्वाचे आहे. दिवसेंदिवस शेतीकामाकरिता मजूरांची कमतरता भासत आहे. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरण, नागरीकरण तसेच इत्यादीमुळे कृषी क्षेत्रात मजूर उपलब्ध होत नाहीत तसेच मजुरांचे दर परवडत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रात कृषी औजारे आणि यंत्रे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. विभागात भात हे प्रमुख पिक असून चिखलणी, उखळणी, लागवड, फवारणी, काढणी सह सर्व प्रकारच्या कामाकरिता यंत्र उपलब्ध आहेत.

            कोकणातील धारणा क्षेत्र कमी असल्याने वैयक्तिक यंत्रे खरेदी करण्यास मर्यादा आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कृषी अवजारे बँक स्थापनेकरिता शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य केले जाते. जिल्ह्यातील पीक रचनेनुसार पिकाच्या पेरणी पासून काढणी पश्चात प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांना माफक दराने यांत्रिकीकरणाची सेवा सुविधा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे तसेच लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण सुविधेचा लाभ देणे हा या घटकाचा मुख्य उद्देश्य आहे. सन 2022-23 या वर्षाकरिता कोकण विभागाकरिता कृषी यांत्रिकीकरण उपभियान आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत एकूण रु. 4कोटी 66 लाखांचा  निधी प्रस्तावित केलेला आहे.

            कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे अनुदान देण्यात येते : औजारे बँक स्थापनेचा खर्च रु.10 लाखापर्यंत, अनुदानाची उच्चतम मर्यादा रु.4 लाख, अर्थसहाय्य 40 टक्के. औजारे बँक स्थापनेचा खर्च रु.25 लाखापर्यंत, अनुदानाची उच्चतम मर्यादा रु.10 लाख, अर्थसहाय्य 40 टक्के.

             कृषी औजारे बँकेचा लाभ घेण्यासाठी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, गट अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा असल्यास प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या वैध जात प्रमाणपत्राची प्रत, संस्थेच्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत किंवा संस्थेची संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास प्राधिकृत केलेल्याचे पत्र व संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड, फोटो असलेल्या ओळखपत्रांचे स्वयं साक्षांकित प्रत ही कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − one =