You are currently viewing आई

आई

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*आई*

 

आई!घरातील एक हक्काचा भोज्या.

गृहितच धरलेला. काही हवं असलं कि,’ आई’ म्हणत भोज्याला शिवायचं आणि पाहिजे ते मागायचे.तिला वेळ

आहे कां !नाही!.

कोणी विचारच करत नव्हते. फक्त आपल्याला काय हवं ? आणि ते आईने द्यावे इतकाच विचार असे.

बिचारी आई!घरच्या जेष्ठ मंडळींची काळजी घेणे, मुलांचं पालन पोषण, शाळा अभ्यास, यजमानांची नोकरी वेळा, डबे हे सांभाळुन सणवार, रूढी, परंपरा, चालीरिती, नातेसंबंध, शेजार धर्म, हे पण अंगावर असेच. घरकाम स्वच्छता, स्वैंपाक ,आलागेल्याची सरबराई हे सुद्धा तिनेच बघायचं. सगळ्यांची आजारपणं, औषधपाणी हे पण!

या सगळ्यात बरेचदा काही चुकलं तर टोमणे ,टिका, व माहेरचा ऊद्धार ठरलेलाच.

ती घरात एवढ्यासाठीच तर आहे हीच प्रत्येकाची भूमिका असे.

तिला शहाणपणा शिकवायला, नावे ठेवायला, सगळी तैय्यार!

त्यामुळे आमच्या पिढीला .. असा ‘मातृदिन’साजरा करावा, हेच मुळी कधी डोक्यात आलंच नाही.

आई किती राबते?…. तिला कधी बरं नसतं का?…कधी माहेरची आठवण होत असेल का?

तिच्या आवडी निवडी, हौस, मौज, विश्रांती यावर लग्न झालं कि, फूली मारली जात असे. तिच्या मानेवर संसाराचं जोखड व जबाबदारी कायमचं लादलं जायचं.

थोडक्यात माणचस म्हणुन वागवलं जायचं नाही. तिच्या भावना !…कोणी लक्षच द्यायचं नाही. सुदैव असेल तर चांगला असलेला नवरा थोडंफार समजुन घ्यायचा पण पुरषी अरेरावी, अहंकार आणि पुरुष प्रधान समाज यामुळे ते. भाग्यातच असायला लागायचं.

आई प्रत्येकाच्या वाढदिवसाला औक्षण, गोडधोड तेही आवडीचे ऐपतीप्रमाणे साजरे करत असे. पण आईचा वाढदिवस कधी?..

तिला काय आवडते?

कसा असावा तो दिवस असं तिला वाटेल?

कोणाला याविषयी विचार करायची आवश्यकता कधी वाटली नाही. आईने तशी कधी मागणीही केली नाही.

किती लवकर ऊठते?..कधी झोपते हे कोणाला माहित नसे.

घरात आजी आजोबा, एखादा काका, आत्या आणि तिचा संसार अशी आठ/दहा माणसं व त्यांच्या वेळा तिला सांभाळायला लागत.

सणवाराला इतर घराची हौसमौज नटणे मुरडणे चालू असे पण आई मात्र घरात अधिकच्या कामात दंग असे.

वर्षातुन दोन चार साड्या ….. त्यापण मिळतील त्या,!आवड निवड नाहीच,

इतकंच काय पण देवदर्शनाखेरिज कूठेही जायचं नसे.

अशी ही ‘आई’ची अवस्था होती कसला मातृदिन?

सगळ्यांना पुरवून सगळ्यात शेवटी जे ऊरेल, पुरेल ते ती विना तक्रार जेवत असे. सगळ्यांना पोटभर मिळालं हेच समाधान तिचं तोंडीलावणे असे. ताकभात, लोणचं पोळी असंच बहुदा वाट्याला येई. ती मागुन जेवायची आहे हा विचार कोण आणि का करणार?

अशी आई ही दुर्लक्षित व गृहित धरलेली होती.

पण आज अनेक वर्षानंतर जाणिव ऊदयाला येत आहे कि घरात ‘आई’पण आहे.

आई म्हणजे मायेचा सागर…‌करूणेची मूर्ती, क्षमेचे भांडार, कष्टांचा डोंगर, पहिला गुरू, ममतेचा कल्पतरू मधाळ स्वर हवाहवासा लोभस स्पर्ष , घराचे घरपण, घराचा आधारस्तंभ, ….. म्हणजे आई असते हे आता सर्वांना कळुन चुकलंय.

आई सतत चारित्र, सदाचार नैतिकता व संस्कार वळण शिस्त .. यावर भिस्त ठेऊन प्रसंगी कठोर होते म्हणुन सदा ऊपदेश करणारी आई नकोशी होती ती आता थोडीतरी आपली वाटू लागली आहे.

तिचं वय , क्षमता, व्याधी सगळ्याची हल्ली दखल घेतली जाते हे ही नसे थोडके.

हल्लीची मुलं तिला बाहेर तिर्थस्थानांना इ. घेऊन जातात. वाढदिवस तिच्या आवडीने साजरे करतात. हौसमौज पूरी करतात. पूर्णपणे काळजी घेतात.

कित्येक ठिकाणी आई आपली आपणच बेधडक हौसमौज फिरणे सहली पोषाख इ. हौस पूरी करून घेते, आणि कोणी टिका करत नाही.

सणवार परंपरा इ. पाळायची तिच्यावर सक्ती नसते.

हे सगळं आशा दायक व कौतुकास्पद आहे . हा स्त्री शिक्षणाचा परिणाम झाला आहे. मुळात खुद्द स्त्रीलाच स्वत्वाची जाणिव खोलवर झाली आहे. तिच्यावर लादलेल्या गोष्टी ती झुगारून आपलं स्वत्व ती जगायला शिकली आहे. हा तिच्या अर्थार्जनाचा परिणाम आहे. ती स्वतंत्र, स्वावलंबी व जबाबदार झाली आहे. घराबाहेर ती नि:संकोच मिसळू लागलीय.

हे व्हायला हवंच होतं. आजच्या मातृदिनी आईचे कौतुक एकताना, पहाताना, मनाला पूर्ण समाधान मिळतय.

आमच्या काळातली आई आता परत मिळणार नाही पण आजच्या सावित्रीच्या लेकी तरी माणुस म्हणुन जगतात याचं अप्रुप नक्कीच वाटतंय.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी. मुं. 69

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा