You are currently viewing स्टॉक रजिस्टर प्रकरणावरून सावंतवाडी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

स्टॉक रजिस्टर प्रकरणावरून सावंतवाडी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

स्टॉक रजिस्टर प्रकरणावरून सावंतवाडी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

जोडारी भारत लाखे यांच्यावर गुन्हा; अ‍ॅड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे SIT चौकशीची मागणी

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद व वापर रजिस्टर (स्टॉक रजिस्टर) गायब करून त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी जोडारी भारत लाखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत शिवसेना नगरसेविका अ‍ॅड. सायली दुभाषी आणि शर्वरी धारगळकर यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नगरपालिकेच्या नियमानुसार स्टॉक रजिस्टर लिहिण्याचे काम जोडारीकडे असले, तरी रजिस्टर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असल्याचे नगरसेविकांनी म्हटले आहे. त्यामुळे रजिस्टर गहाळ झाल्याची फिर्याद पाणीपुरवठा विभागप्रमुखांकडूनच होणे अपेक्षित असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, तक्रारदार अधिकारी संजय पोईपकर यांनी ऑडिटसाठी पुरवठादाराकडून दीड लाख रुपये घेतल्याची समितीच्या बैठकीत कबुली दिल्याचा दावा नगरसेविकांनी केला आहे. तसेच संबंधित पुरवठादारानेही पैसे दिल्याचे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यानेच आरोपीविरोधात पोलिसांत फिर्याद कशी दाखल केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात केवळ जोडारी यांच्यापुरतेच प्रकरण मर्यादित नसून मुख्याधिकारी, विभागप्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासणे आवश्यक असल्याचे अ‍ॅड. दुभाषी व धारगळकर यांनी म्हटले आहे. संबंधित विभागप्रमुख कांबळी यांनी स्वतः फिर्याद दाखल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी नगरपालिकेच्या प्रतिमेला या प्रकरणामुळे धक्का बसला असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून मुख्याधिकारी, तक्रारदार अधिकारी तसेच या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असलेल्या सर्वांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आपण अधिकृतपणे करणार असल्याचे अ‍ॅड. सायली दुभाषी व शर्वरी धारगळकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा