पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीची ‘रिल्स’ स्पर्धा
प्रथम क्रमांकासाठी ५ हजारांचे बक्षीस; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान स्पर्धेचा कालावधी
वैभववाडी :
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने ‘पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली गणपती व सजावट रिल्स स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांनी जास्तीत जास्त एक मिनिटांचा व्हिडिओ (रिल्स) तयार करून दिलेल्या कालावधीत वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीकडे सादर करावा. स्पर्धेसाठी गणेश चतुर्थीचे स्वागत व आगमन, बाप्पांची आरास व सजावट, गणेश आरती व भक्तीभाव, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, गणेश चतुर्थीचे संदेश व शुभेच्छा तसेच ‘पर्यावरण वाचवा, गणेशोत्सव साजरा करा’ आदी विषय देण्यात आले आहेत.
स्पर्धेचा कालावधी १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ असा आहे. स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या रिल्सना रोख बक्षिसे देण्यात येणार असून
प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये,
द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि
तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये
असे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. QR कोड स्कॅन करून स्पर्धेसाठी नोंदणी करता येणार आहे.
या उपक्रमासाठी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीकडून नियोजन करण्यात आले आहे.
