वीज ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दरमहा ऊर्जामित्र बैठका आयोजित कराव्यात.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची अधिक्षक अभियंता यांच्याकडे मागणी
वैभववाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारी व प्रश्न सोडविण्यासाठी मा. अध्यक्ष जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्ग तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या तालुका व उपविभागीय कार्यालयांमध्ये दरमहा ऊर्जामित्र बैठका आयोजित करण्यात येत आहेत. परंतु काही ठिकाणी अनियमितता व टाळाटाळ केली जात आहे. या उर्जा मित्र बैठका नियमित आयोजित करण्यात याव्यात या बाबतचे निवेदन
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने अधिक्षक अभियंता, सिंधुदुर्ग यांना दिले.
जिल्ह्यातील जवळपास सर्व ठिकाणी उर्जा मित्र बैठका नियमित होत असतांना सिंधुदुर्गनगरी उपविभागातील उपकार्यकारी अभियंता यांनी माहे जुलै २०२६ पासून बैठका आयोजित केलेल्या नाहीत.
सिंधुदुर्गनगरी शाखेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन
उर्जा मित्र बैठक आयोजित करण्याबाबत चर्चा व विनंती करूनही बैठका घेण्याचे टाळले जात आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचना आल्यावर विचार करू असे सांगण्यात आले. याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने म.रा.वि.वि.कं सिंधुदुर्ग अधिक्षक अभियंता यांच्या वतीने उप कार्यकारी अभियंता श्री.गायकवाड यांना दिले असून त्याची प्रत अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी व कार्यकारी अभियंता, कुडाळ यांना दिली आहे.
तसेच ओरोस -सिंधुदुर्गनगरी येथील उघड्यावरील ट्रान्सफॉर्मरना सुरक्षित कुंपण घालणे, भर वस्तीतील विजवाहक तारा बदलून इन्सुलेटेड कव्हर्ड तारा घालणे व सध्याच्या तारांना सुरक्षिततेसाठी गार्डिंग सपोर्ट देणे, आवश्यकत्या ठिकाणी खांबाना ठळकरीत्या डेंजर फलक लावणे, श्री.पारकर -खरयेवाडी यांच्या आवारातील धोकादायक वीज खांब अन्यत्र हलविणे इत्यादी बाबींची कार्यवाही तात्काळ करण्यासाठी संबंधिताना सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा संघटक श्री. विष्णूप्रसाद दळवी, सिंधुदुर्गनगरी अध्यक्ष श्री. श्रीराम चव्हाण, संघटक- सूर्यकांत पाटील, कोषाध्यक्ष राजन वालावलकर उपस्थित होते.
