*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वृत्त हरिभगिनी*
*(हिंदी=शुभांगी वा शोकहर)*
*मात्रा=८+८+८+६=३०*
*शीर्षक= गं*
शिंपडले तू तुषार स्नेही माझ्यावरती डाळिंबी
आणि लावला लळा तुझा गं मधुराम्लाचा मोसंबी
तूच अप्सरा माझ्यासाठी धरतीवरती रंभा गं
भविष्य माझे तुझ्याच हाती तूच रती मी अनंग गं
काय सांगु गं तू तर ललना वसुंधरेवर सोनसळी
महाभारती मत्स्यकन्यका सौंदर्याची मासोळी
लावण्याची तुला देणगी तूच दिसावी पदोपदी
तोच मसाला घेवुन व्हावी कविता माझी आनंदी
मौक्तिक पाचू हिरे माणके शब्दच माझे नीलमणी
तुला वाहुनी आनंदाने तृप्तच व्हावे मनोमनी
मुक्तच व्हावे आयुष्याचे अर्पुन तुजला पळ पळ गं
तुजसाठी ते वेचावे मी शब्दसुगंधी कण कण गं
तुझ्यावाचुनी मला सुचावे कधी न काही लेखन गं
तुझ्याचसाठी अक्षर अक्षर सतत असावे माखन गं
तू सम्राज्ञी तू तर महिषी अथवा राणी माझी गं
तू नसतांना उजाड असतो कागद कोरा माझा गं
*सर्वस्पर्शी*
वैद्यराज कविवर्य भूपाल देशमुख
९८२३२१९५५०
