You are currently viewing संगीत नाटकातील नाट्यपदातून दिसणारे श्रीकृष्णाचे स्वरूप

संगीत नाटकातील नाट्यपदातून दिसणारे श्रीकृष्णाचे स्वरूप

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम लेख*

 

*संगीत नाटकातील नाट्यपदातून दिसणारे श्रीकृष्णाचे स्वरूप*

 

महाभारतात नसलेली आणि तरीही भक्त जगतात कृष्णाच्या बरोबरीने अढळपद मिळविणारी, श्रीकृष्ण चरित्रात महत्त्वाचं स्थान प्राप्त करणारी, अवघे कृष्णजीवन व्यापून टाकणारी !

आणि कृष्णाच्या आठ पत्नी असूनही अभंग, भजन, भावगीत, नाट्यगीत, लोकगीत व लेखनाच्या सर्व प्रकारात कृष्णसोबतीने विहार करणारी..

“ही राधा होती तरी कशी”?

 

‘मराठी संगीत नाटकांतील नाट्यपदांतून दिसणारे श्रीकृष्णाचे स्वरूप’

..हा विषय PhD साठी अभ्यासत असताना राधा माझीही प्रिय सखी बनली होती. पण एवढी साडेसात वर्षे अभ्यास करूनही राधा कळलीच नाही..

कशी होती राधा ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. मनाच्या आतल्या कप्प्यात हुरहुरत राहिला.

 

सामान्यत: साधू संतांचा चरीत्रपट अलौकिक चमत्कार आणि आख्यायिकांच्या दाट धुक्यात लपेटलेला असतो.

कृष्ण काय, राधा काय किंवा मीरा काय- या सर्वांच्या कथा..’काय खरे, काय खोटे ?’..असा संभ्रम निर्माण करणाऱ्याच असतात.

राधेच्या भिन्न भिन्न उपपत्तीही घोटाळ्यात टाकणाऱ्या आहेत.

श्रीकृष्ण जीवनाच्या अंगप्रत्यंगाच्या वर्णनाने भरलेला ग्रंथ.. “हरिवंश”! यात राधेचा उल्लेख नाही. श्रीकृष्णाच्या सामाजिक व राजकीय जीवनाचे निरूपण करणारा प्रमाणभूत ग्रंथ- “महाभारत”! यातही कोठे राधा नाही. राधेचा उल्लेख केवळ ब्रह्मवैवर्त पुराणात सापडतो, असे महादेवशास्त्री जोशी म्हणतात.

तसेच गोकुळातली ही गोपी वैष्णव संप्रदायातील आराध्य देवता मानली गेली असली तरी राधेच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाविषयी काही पुरावे सापडत नसल्यामुळे विद्वान तिला काल्पनिकच समजतात.

“अनयाराधितो नूनं”।..या भागवतातील श्लोकाच्या आधारे कल्पनेच्या बळावर पौराणिक कवींनी निर्माण केलेली ती व्यक्ती आहे असंच त्यांचं मत आहे.

 

प्रेमभक्तीचा महिमा वाढविण्यासाठी पुराणकारांनी राधेला श्रीकृष्ण जीवनात

मानाचे व महत्त्वाचे स्थान दिले आणि कालांतराने ते इतके रूढ झाले, की आज कृष्णाचे नाव उच्चारताच राधा आठवते. किंबहुना कृष्णाआधीच राधेचे नाव घेतले जाते.

 

राधा म्हणजे –

कृष्ण सखी, अनयाची स्त्री, नाचकामाकरिता स्त्रीवेष धारण करणारा असे अर्थ शब्दकोशात आहेत.

‘रा + धा’= रासक्रीडेकरिता धावणारी गोपी’! असाही एक अर्थ मिळतो. बाबामहाराज सातारकर -‘राधा’ची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात. ‘पुढे वाहते ती धारा आणि उलटी जाते ती राधा’!

 

म्हणजे काय ? आपले डोळे विषयाकडे धावतात. जगाकडे, वस्तूकडे धावतात. पण जगाकडे जाऊन ती नजर पुन्हा उलटी फिरते. ती राधा !’

परतोनी मागे फिरणारी, बहिर्मुखतेतून अंतर्मुखतेकडे वळणारी नजर ज्याला प्राप्त झाली त्या व्यक्तीला ‘राधा’ म्हणतात.

 

एकेकाळी संगीत नाटकांनी मराठी रंगभूमी गाजवून सोडली होती. राधाकृष्णाची नाटके तर प्रेक्षकांना हमखास आवडतील अशीच !

त्यावेळच्या राधामाई, वेणुनाद, नंदकुमार, सं. मथुरा, कंसकंदन, बालक्रीडा, श्रीपुंडलिक, सुवर्णतुला इ. संगीत नाटकांतून राधा हे पात्र येते.

जेवढे नाटककार, तेवढे राधा-कृष्णाविषयीचे वेगवेगळे भाव आढळून येतात. प्रत्येक नाटककाराने उभी केलेली राधा-कृष्णाची एकमेकांना उद्देशून पदे.

व राधाकृष्णाबद्दलची इतरांची पदे – ही सर्व.. त्यांच्या आपापसातील नात्याबाबत गोंधळ निर्माण करणारीच आहेत.

नाट्यपदांतून राधा कशी दिसते ?

गो. नी. दांडेकरांच्या ‘राधामाई’ नाटकात

राधा ही कृष्णाच्या मातेचे स्नेहाळ रूप लेवून सामोरी येते. “प्रत्येक अवतारात संत हे भगवंताचे सहप्रवासी असतात असा संकेत आहे. माझी राधामाई त्यातीलच एक आहे.” असे गो. नि. दांडेकर म्हणतात.

कृष्णावतारात श्रीहरीवर पुत्राहून आगळे प्रेम करून ती धन्य झाली. यशोदेला पुत्र झाला त्यावेळी राधेला पडलेले स्वप्न, यशोदेसारखेच तिला होणारे भास हे राधेचे मातृत्व दाखविणारेच आहेत.

‘सखी मी धाले आनंदाने

आनंदाने बहरे त्रिभुवन’

 

असे तिचे जीवन आनंदाने नटले आहे.

 

‘सख्या दाटला तव स्नेहाचा पान्हा माझे उरी’

असे हे वात्सल्य आहे.

 

या राधेच्या पदातून हळुवार मनात दाटणाऱ्या मातृसुलभ आनंदाचे दर्शन होते व कृष्ण बाळाविषयी तिच्या मनात उमलून येणारे नाते अशा रीतीने व्यक्त होताना दिसते.

या नाटकातील राधा तत्त्वचिंतक आहे. तिच्या मनाच्या मुळाशी तत्त्व चिंतनाची बैठक आहे आणि हे संस्कार असल्याकारणाने तिचे सारे अनुभव सौंदर्यरूप धारण करून बाहेर पडतात.

‘ती स्वत:त मुळी न उरली

अंतरी तशी बाहेरी

निजरंगी रंगली’ (राधामाई)

यातून ती आत्मविकासाची वाट निष्ठेने चालताना दिसते. कृष्णाच्या न कळत्या वयापासूनच त्याच्या बालमनावर राधेचे हे तत्त्व चिंतनाचे संस्कार पडले असणार आहेत.

 

सं. वेणुनाद’..

या नाटकात राधाकृष्- “बहीणभाऊ” ..या नात्याने जोडलेले दिसतात. तर ‘बालक्रीडा’ या नाटकात ते..

“भक्त आणि भगवंत” आहेत.

‘नंदकुमार’नाटकात-

“कृष्ण राधेचा गुरू”

आहे तर

‘सुवर्णतुला’ ‘वेणुनाद’ नाटकात..

“राधा श्रीकृष्णाची गुरू” आहे.

अमृतसिद्धी नाटकात राधा कृष्णाची सल्लागार आहे. श्रीकृष्णाच्या द्विधा मन:स्थितीत तिनेच त्याची समजूत काढली आहे.

 

ज्या व्यक्तीच्या सहवासात शांत वाटते, समाधान लाभते, साहजिकच तेथली ओढ मनाला लागते. कृष्णाला राधेच्या सहवासात नेहमीच शांती लाभलेली आहे. त्यामुळेच तिला..

’शान्तीदायी दान राधिके’(सं.वेणुनाद)

म्हटले आहे.

‘सं. मधुरा’ नाटकात

“कृष्ण राधेचा मानस हंस” आहे. पुढील पूर्ण पदात तर राधेने परम उत्कटता गाठली आहे.

 

“आराम जो मनाचा तो शाम राधिकेचा।

चैतन्य जो जगाचे, जो प्रेम सज्जनांचे

आनंद योगियांचा तो शाम राधिकेचा॥

दुष्टास काळ गमतो, काळासी काळ दिसतो

थोरात थोर साचा, तो शाम राधिकेचा॥

 

श्रीकृष्णाच्या श्रेष्ठतेबद्दल, त्याच्या महानतेबद्दल तिला अपार आदर आहे. कृष्णाची किंमत ओळखणारी राधा ही एकच व्यक्ती आहे.

कृष्णाचे देवत्व राधेलाच कळले आहे. त्याच्यात काहीतरी विशेष आहे असे तिला वाटते. कारण कृष्णात जी वैशिष्ट्ये आहेत ती, ती जाणून आहे.

कृष्णहृदय पापी नाही, असे सांगताना राधा अनयला (पतीला) उद्देशून म्हणते –

‘नसे कृष्ण पापी कांता

दिव्यरूपे नटले भासे,

पाप नाशनासी आता

गोजिरी बालमूर्ती ही

मंगलात मंगल नाथा”

 

राधेचा भक्तिभाव..

दास्य वात्सल्य सख्य

या भावापलीकडचा होता. आपले सर्वस्व समर्पण करणे हेच तिच्या भक्तीचे स्वरूप !

सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणे व त्याचे क्षणभरही विस्मरण झाले तर परम व्याकुळ होणे हीच खरी भक्ती असे नारद म्हणतात,

या खऱ्या भक्तीची सर्व लक्षणे राधेच्या भक्तीत दिसतात. ‘बालक्रीडा’त ती म्हणते –

हरिसन्निध जाईन मी

हर्षभरित होईन मी।

भक्तिरसे माखीन मी प्रेमाश्रू सिंचीन मी॥

पण..

*राधाकृष्ण नात्याचा दुरुपयोगही*

केला गेला आहे.

तो असा-

‘चल चल सखया मारू मौजा

मग मी कृष्ण अन तू राधा’।

(सं.रुक्मिणीहरण) तसेच..

‘कृष्ण तुम्ही मी राधा होऊनी,

रंग करू ही रास’(सुंदरमाधव)

याप्रमाणे नाटकातील स्त्री पात्र व पुरुषपात्रांमधे राधा कृष्णाचा

अश्लील रूपाने प्रतीकात्मक वापर करताना दिसतात. जेथे जेथे प्रेमाची गोष्ट येते, तेथे तेथे राधाकृष्णाचे नाव जोडले जाते.

 

विलासी काव्यात तर सर्रास राधाकृष्णाचा वापर केला जातो. हे मनाला सतत खटकत राहते. कारण..

गोकुळातले कंसकंदन वेळचे कृष्णाचे वय पाहता हे भाव परस्पर विसंगत व परस्पर विरोधी आहेत. त्या गुटगुटीत बाळसेदार, गोंडस गुणी आणि देखण्या कृष्ण बाळाविषयी गोपी व राधेच्या मनात वात्सल्याशिवाय दुसरी कोणतीही भावना निर्माण होण्याचा संभवतच नाही.

निरनिराळ्या पुराणात राधेच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा आढळतात. तांत्रिकाच्या मते.. राधेच्या उगमाचे बीज शक्तीकल्पनेत आहे. ती कृष्णाची “ल्हादिनी शक्ती”

मानली जाते. पौराणिक मतानुसार राधा एक मंत्र आहे. ‘श्री राधायै स्वाहा’। हा षडाक्षरी मंत्र देवी भागवतात आहे.

मधुराभक्ती संप्रदायात श्रीकृष्णाच्या समस्त लीलांची ती संचालिका असून कृष्णाकडून आराध्य आहे असे मानले आहे, तर राधावल्लभ संप्रदायात “कृष्णाच्या आनंदाचेच नाव राधा” आहे ! याप्रकारे वेगवेगळ्या संप्रदायातून थोडे थोडे वेगळेपण असले तरी कृष्णाबरोबर राधा आहेच.

 

रुक्मिणीला दूर करून राधेची प्रतिष्ठापना सुप्रतिष्ठित मानली गेली आहे. शिवाय राधा-कृष्णाचे गुणसंकीर्तन केले जात आहे. राधेसह कृष्णभक्तीचा, पूजेचा प्रघात आहे आणि प्रचारही आहे.

 

प्रत्येक जाती धर्मात राधेचे स्थान कसे नि किती आहे, याचा शोध घेत असता पुढील उत्तरे मिळाली ती त्यांच्याच शब्दात..

 

“राधा किशनको” तो सारा संसार मानता है। इसके भगतगण हर डिस्ट्रिक्टमे मिलेंगे.”

पंजाबी अगरवाल..

‘राधा कृष्ण को बहुत मानते है। राधा तो जन्मजन्मांतरी की है’।

त्यांची राधा-कृष्णावरील गीतेही मजेशीर आहेत.

 

“राधे तूने कैसे खेल रचायी है।

जब तू जल भरने जाती है –

हरी घागरिया उठाते है

जब तू भोजन बनती है

हरी मांगकर खाते है

सोलह शृंगार जब तू करे राधे-

हरी दर्पण दिखलाते है॥

मारवाडीत..

बिना राधा कृष्ण आधा- ऐसाही माना जाता है। क्योंकी कृष्ण भगवानके लिये कुछ भी करने को तैयार “ऐसा और इतना” कृष्णके प्रति राधाका लगाव था ।

 

“राधा पूजामे नही रखी जाती लेकिन टेम्पलमे होती है।

भले ही राधा बडी है। प्रेमिका गोपी करके राधाका बहुत ही महत्त्व है”|

 

वैष्णव गुजरातीत “पूजेच्या सर्व प्रकारात राधा” प्रामुख्याने आहेच !

जयदेव जयदेव

जय राधाजीना

उॅंचा मंदिर।

असे राधेला सर्वोत्तम स्थान दिले आहे.

 

धूनमध्ये..

‘राधे राधे शाम मिला दे’। असा गजर करतात. कृष्णाला भेटण्यासाठी राधेलाच साकडं घालावं लागतं, हे वाचून आठवण आली –

नाटकातील राधेच्या व्रताची !

ज्याला कृष्णाला भेटायचं असेल त्यानं राधेचं व्रत करायचं.

‘वेष राधेचा साजरा |

उतरे थोरांचा तोरा |

अर्पण करी तनमनधन’

(सं. त्रिदंडी संन्यास)

असा उपासनेचा मार्ग सुचवला आहे.

मद्रासी ब्राह्मण- राधाकृष्णाला मानतात.

‘राधेश्याम राधेश्याम’ या गजराबरोबरच त्यांच्या गीतामध्ये..

राधा समेता कृष्णा’।

असा उल्लेख येतो.

‘मोपे कृपा करो श्री राधे’। असे म्हणत राधेचे भक्तगण

सारं काही विसरून राधा कृष्ण प्रेमात आत्मविस्मृत होतात.

‘श्री राधे जय राधे’।

अशा या “जयघोषात राधा” आहे.

“संकीर्तनात राधा” आहे, “आरतीत राधा” आहे. असे हे “भक्त –

राधामय” आहेत.

 

हिंदूंमधेही सर्वसाधारणपणे राधा ही कृष्णाची प्रेयसी, सखी म्हणूनच समजली जाते. वेगळं अस्तित्वच नाही अशी नि इतकी ती कृष्णाबरोबर एकरूप झालेली आहे.

“अत्युच्च प्रेमाचं प्रतीक” असंच ते मानलं गेलं आहे.

गजर करतात तेव्हा ..

‘राधा कृष्ण’च म्हणतात.

‘कृष्ण राधा’ असे कधीही म्हणत नाहीत. कारण ..

“माझ्या आधी लोक तुझं नाव घेतील”.

असा कृष्णाकडून राधेला वर मिळाला आहे.

 

साहित्यिक, नाटककार यांना कृष्णासाठी ‘महाभारत’ या खाणीतून जसे अनेक विषय मिळाले. तसेच चित्र, शिल्प इ. कलाप्रांतातील कलावंतांना व काव्य लेखनादि वाग्ड्मय प्रकारातील साहित्यिकांना राधेचे स्वरूप त्यांच्या बुद्धीला, प्रतिभेला, कल्पनेला आणि कल्पकतेला आव्हान देणारे ठरले आहे.

या सर्व प्रकारातून राधेची व्यक्तिरेखा रेखीवपणे ठसठशीतपणे उभी रहात असली तरी या विविधतेतही तिच्या छटा दिसतात. त्या त्याच त्याच प्रकारच्या ! सुखद प्रेमानुभूतीचे दर्शन घडविणाऱ्या !

पण..

*राधेचे राधेपण हेच नि असेच होते का* ?

शोधक वृत्तीने पाहिल्यावर तिच्या अबोध जाणिवांच्या अस्तित्वाचे आकलन व्हायला लागले. गहन काळोखात गुरफटलेल्या राधेची अनेक निनावी दु:खे मला जाणवायला लागली. तिच्या दडपलेल्या मनोविश्वातील तिची आंदोलने आपल्यापर्यंत पोचलीच नाहीत कधी !

तिच्या भावभावना, व्यथा वेदना आपण जाणूच शकलो नाही कधी !

..असे वाटून आपल्याला *खरी राधा कळलीच नाही* असे तीव्रतेने वाटायला लागले”.

तिच्या मनाच्या गाभ्यापर्यंत आपण का नाही गेलो ? तिच्या आक्रंदनाचा स्तर आपल्याला कसा कधीच कळला नाही ? या जाणिवेने मनाला अगदी पिंजून काढले आहे.

 

किती दिवस, किती महिने झाले, राधेला समजून घेण्यासाठी मन तडफडतंय, तळमळतंय. का कळत नाहिये मला राधा ? राधेच्या भूमिकेत शिरून तिला कळून घेण्याचा प्रयत्नही करून झाला.

आणि आता जाणवतंय ते हेच की.. राधेला समजून घेण्यात आपणच कुठेतरी कमी पडलो आहोत.

राधेला मूल नव्हतं. लोण्यासम मृदू मन ल्यायलेल्या राधेच्या जीवनात चिमुकल्या कृष्णानं प्रवेश केला. आणि तिच्या साऱ्या कामना तन्मय झाल्या. बाल कृष्णावर तिनं भान हरपून, सर्वस्व अर्पून प्रेम केलं. तिचं खाणं पिणं, बोलणं चालणं, गाणं.. सारं सारं त्या सोनुल्या हरीसाठी !

खरं तर गोकुळातला काळ हाच त्या दोघांचा सहवास ! त्यांच्या निर्व्याज वात्सल्यप्रेमातून आकाराला आला..

*एक अतूट ममतेचा स्नेहबंध* !

श्रीकृष्ण गोकुळातून निघून गेल्यावर तर..

‘ध्यानी मनी कृष्ण आठवणी’

अशीच अवस्था झाली असेल राधेची ! कारण आपले सारे मनोभाव तिने कृष्णाभोवती गुंफलेले !

सडा सारवण, दळणकांडण, दही घुसळणं.. ही सारी कामं करीत असतानाही मनानं ती ‘कृष्णमयी’च होती.

 

मूल नसल्याची व्यथा ! आणि ज्या बालकृष्णावर जीव जडवला तो गोकुळ सोडून गेल्यावर या जडलेल्या वात्सल्पूर्ण नात्याचा संपत आलेला स्नेह जाणवून तर तिच्या मनाची केवढी घालमेल, केवढा आकांत !काळजाची केवढी उलाघाल झाली असेल ! या हरवलेल्या राधेला दिलासा मिळाला असेल तो कृष्ण आठवणीत !

या सोनुल्याच्या स्नेहाची संजीवनी पुरवून पुरवून तिने आपलं सारं आयुष्य व्यतीत केलं असेल.

त्यामुळेच वाटत रहातं –

खरी राधा आपल्यासमोर आली नाही कधीच !

लक्ष्मणाची उर्मिला जशी उपेक्षिली गेली तशीच.. “खरी राधा” दुर्लक्षिली गेली आहे. “खरी राधा आपण उभी करूच शकलो नाही” असे मला म्हणावयाचे आहे.

 

माझे पती डॅा.शरद शहा. स्त्री रोगतज्ञ ! त्यांच्याबरोबर कन्सल्टिंगला मीही बसत असे. तेव्हा त्यावेळी यांना दाखवायला आलेले, अपत्य नसलेले स्त्री-पेशंटस्..

बाळासाठी आसुसलेल्या, छकुल्यासाठी तळमळणाऱ्या, अपत्यासाठी व्याकुळ झालेल्या..

त्या पेशंट स्त्रियांना जेव्हा पाहते तेव्हा..

*त्यांच्यात मला राधा* दिसू लागते.

त्यांच्या साऱ्या व्यथा याच राधेच्या व्यथा आहेत असे वाटायला लागते. आत्ता पेशंटमध्ये जे दु:ख मी पाहतेय अगदी तेच, तसेच दु:ख राधेने त्यावेळी भोगले असेल,

..हे साधर्म्य जाणवून चहुबाजूंनी प्रतीत होणारी ही राधेची वेदना.. मग मलाही अस्वस्थ बेचैन करीत राहते.

 

तिच्या जीवनातली ही.. तिला सतत सलणारी, अविरत तिला बोचणारी, जाळणारी, तिचे काळीज पोखरून काढणारी ही जळजळीत जाणीव आपल्याकडून व्यक्त तर केली गेली नाहीच. उलट तिला आपण..

अभिसारिका, प्रेमिका, आदि अष्टनायिका भूमिकेत राधेला रेखाटण्यात नि चितारण्यातच धन्यता मानीत आलो.

मूल नसल्याचे सदा जळजळीत दु:ख राधा अनुभवीत असताना आपण तिला रासक्रीडेत नाचवत राहिलो. तिची आर्त आकुळ व्याकुळ भावस्थिती असताना तिला भावमुग्ध दाखवण्यात दंग झालो. (कांगडा शैलीतील राधा भावमुग्ध आहे)

भावनांच्या धगीत ती पोळून निघत असताना तिच्या चेहऱ्यावर शृंगारभाव रेखाटण्यात मशगुल झालो.

हा तर ..

*सरासर अन्यायच आहे राधेवर* !

वास्तवातली तिची विकल अवस्था आणि नाट्यपदे, भावगीते, सिनेगीते, कविता, चित्र, शिल्प यातून दिसणारी राधा !. यात कुठेही संगती लागत नाहिये.

आणि म्हणूनच..

मला कळत नाहिये-

*खरंच कशी होती राधा* ?

 

डॅा.शरयू शहा.मुंबई.

9619023330

॰॰॰॰॰॰॰॰

प्रतिक्रिया व्यक्त करा