पारदर्शक सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी : मतदार यादी निरीक्षक शीतल तेली – उगले
सांगली, ( प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार ) : मतदार यादी त्रृटीविरहित व अचूक होण्यासाठी संबंधित नियुक्त यंत्रणांनी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम प्रभावीपणे पूर्ण करावे. एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली – उगले यांनी येथे दिल्या.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त तथा सांगली जिल्हा नोडल अधिकारी संतोष भोर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, सर्व मतदार नोंदणी अधिकारी रघुनाथ पोटे, रणजीत भोसले, श्रीनिवास अर्जुन, डॉ. प्रकाश बांदल, विजया यादव, समाधान शेंडगे, अजयकुमार नष्टे, विशाल यादव उपस्थित होते.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दावे व हरकती 30 सप्टेंबरपर्यंत नोंदवण्यात येणार आहेत. नोटीस तसेच दावे व हरकती निकालात काढण्यासाठी 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबरचा कालावधी असून, 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक शीतल तेली – उगले प्रत्येक जिल्ह्यात तीन भेटी देणार आहेत. त्यातील पहिली भेट आज झाली असून, यावेळी त्यांनी मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला.
मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही. तसेच अपात्र अथवा चुकीच्या नोंदींबाबत नियमानुसार कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणेने काटेकोरपणे काम करावे, असे सूचित करून मतदार यादी निरीक्षक शीतल तेली – उगले म्हणाल्या, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमातंर्गत मतदारसंघ निहाय नियुक्त मतदार नोंदणी अधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम आखावा व विहित वेळेत तो पूर्ण करावा. यासाठी जिल्हास्तरावरून आवश्यक समन्वय साधावा व नियमित आढावा घेण्यात यावा. मतदार यादीतील नोंदी अचूक व अद्ययावत राहतील, यासाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओ यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी ठेवावा, असे त्या म्हणाल्या.
मतदार यादी निरीक्षक शीतल तेली – उगले म्हणाल्या, दावे व हरकती सुनावणीसाठी मतदारांच्या सोयीचे ठिकाण निवडावे. बीएलओनिहाय सुनावणी घेतली तर सर्वांना अधिक सोयीचे होईल. मतदारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दावे व हरकतींचे वेळेत निराकरण करावे. एकगठ्ठा अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हास्तरीय समितीचे गठण करावे. स्वीप उपक्रमांतर्गत अधिकाधिक जनजागृती करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबतही बैठक
या बैठकीनंतर मतदार यादी निरीक्षक शीतल तेली – उगले यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी त्यांनी मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक होण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच, एकाच कुटुंबातील मतदार एकाच मतदान केंद्रावर राहावेत, या अनुषंगाने उपस्थित प्रतिनिधींनी केलेल्या मागणीला मतदार यादी निरीक्षक शीतल तेली – उगले यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या.
यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, मतदारांच्या नोंदींबाबतच्या सूचना आणि क्षेत्रीय पातळीवरील बाबी मांडल्या.
