You are currently viewing रंगदृष्टी अभिनव उपक्रम चर्चेत 

रंगदृष्टी अभिनव उपक्रम चर्चेत 

छत्रपती संभाजीनगर / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रदर्शिक कला विभागात ‘रंगदृष्टी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासोबतच त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसेच विद्यार्थ्यांना कलात्मक अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे विभागप्रमुख प्रा. डॉ. वैशाली बोदेले यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन विभागाचे प्रमुख डॉ. बाबासाहेब डोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात डॉ. डोळे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून सर्जनशीलतेचा विकास करण्याचा हितोपदेश केला. फिजिक्स आणि ड्रामा यांचा संबंध जवळचा आहे. कला आत्मसात करताना विद्यार्थ्यांनी तन-मन-धनाने ज्ञानग्रहण केले पाहिजे. कलित कला, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातली पाहिजे. विद्यार्थ्यांनी शास्त्रातून शास्त्र शिकत असतानाच अंत:करणातून रंग आणि कलाविष्कार व्यक्त करण्याची क्षमता विकसित करावी, असे डोळे म्हणाले.

प्रा. डॉ. स्मिता साबळे यांनी शिक्षक कसा असावा, याचे उदाहरण देताना प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब, शशिकांत बऱ्हाणपूरकर, डॉ. कुमार देशमुख, सीने अभिनेत्री गीता अग्रवाल यांचा उल्लेख केला. या शिक्षकांसारखी सर्जनशिलता विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, असा सल्ला साबळे यांनी दिला. विभागप्रमुख प्रा. डॉ. वैशाली बोदेले यांनी अध्यक्षीय समारोप केला.

याप्रसंगी डॉ. गजानन दांडगे, डॉ. विशाखा शिरवाडकर, डॉ. संजय सांगवीकर, डॉ. गणेश शिंदे, प्रा. प्रदीप कांबळे, प्रा. रमेश धोंडगे, प्रा. सचिन शिंदे, प्रा. मुरलीधर भुताळे, प्रा. सुनील कांबळे, प्रा. योगेश गचे आदींसह विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

नृत्य, नाट्य आणि संगीताने सजलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन अपूर्व उत्साहात साजरा केला. नव्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत वातावरण भारावून टाकले. एकूणच कलाविष्कार, मनोरंजन आणि सर्जनशीलतेचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमातून अनुभवण्यास मिळाला.

‘रंगदृष्टी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला सादरीकरणासोबतच नवनिर्मिती, प्रयोगशीलता आणि आत्मविश्वासाला चालना देणारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलात्मक जडणघडणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत विभाग प्रमुख डॉ. वैशाली बोदेले यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन बसवराज टाकळे यांनी, तर डॉ. गजानन दांडगे यांनी आभारप्रदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा