पुणे, (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार)
“वास्तुकला म्हणजे केवळ जागा किंवा इमारतींचे डिझाईन करणे नव्हे, तर माणसांचे जगणे समृद्ध करणे, त्यांचे शिकणे आणि परस्परांमधील नाती अधिक दृढ करणे होय. बदलत्या काळाची पावले ओळखून, समृद्ध वारशाचा आदर करत भविष्यातील जबाबदार वास्तुविशारद (Architects) घडवण्याचे काम येथे होत आहे,” अशा शब्दांत प्रसिद्ध उद्योजिका व शिक्षणतज्ज्ञ सौ. स्वप्नाली विश्वजीत कदम यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला सौ. स्वप्नाली विश्वजीत कदम यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
महाविद्यालयात आगमन होताच प्राचार्या, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या भेटीदरम्यान महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रम, वास्तुकलेचे नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. उपस्थितांशी संवाद साधताना सौ. स्वप्नाली कदम पुढे म्हणाल्या की, “महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक शिक्षण न देता, उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करण्याची वृत्ती रुजवली जात असल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला.
सर्जनशीलते सोबतच सामाजिक जाणीव आणि उद्देश जपणारी नवीन पिढी घडवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि या भेटीमुळे आमचा हा संकल्प अधिक दृढ झाला आहे.”त्यांच्या या संवेदनशील विचारांचे आणि भूमिकेचे उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले. या प्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ पदाधिकारी, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
