मालवणात ५० बेडचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी आरक्षित जागा द्या
राजेंद्र मसुरकर यांचे नगराध्यक्ष ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना निवेदन; सर्वपक्षीय एकजुटीने प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन
मालवण :
मालवण शहरातील सध्याच्या ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० बेडच्या सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी नगरपरिषदेच्या ताब्यातील एक एकरपेक्षा अधिक आरक्षित जागा शासनास उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ममता वराडकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
मालवण शहरातील सध्याचे ग्रामीण रुग्णालय केवळ ३० बेडचे असून, तेथे मर्यादित वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल सर्जन, अस्थिरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ यांसारख्या आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नसल्यामुळे गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी कुडाळ किंवा जिल्हा रुग्णालय ओरोस येथे पाठवावे लागते, असे मसुरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
गर्भवती महिला व अपघातग्रस्त रुग्णांची होतेय गैरसोय
मालवण परिसरातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी कुडाळ येथील शासकीय रुग्णालयात जावे लागते. अनेकदा वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच प्रसूती होण्याची परिस्थिती निर्माण होते, असा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. अपघातग्रस्त रुग्णांनाही प्राथमिक उपचार करून थेट ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मालवण हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून, सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही मालवणमध्ये सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे मसुरकर यांनी स्पष्ट केले.
सध्याची रुग्णालयाची इमारत पाडू नका
सध्याचे ग्रामीण रुग्णालय ज्या जागेवर आहे, ती जागा मोरे कुटुंबीयांनी बक्षीसपत्राद्वारे महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे. त्याच ठिकाणी विद्यमान इमारत पाडून नवीन उपजिल्हा रुग्णालय उभारल्यास बांधकामाच्या काळात तीन ते चार वर्षे रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी जागेवर नवीन रुग्णालय उभारणे अधिक योग्य ठरेल, असा मुद्दा मसुरकर यांनी मांडला.
नगरपरिषदेच्या ताब्यातील एक एकरपेक्षा अधिक आरक्षित जागा शासनास उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी ५० बेडचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय, पार्किंग व्यवस्था तसेच डॉक्टरांसाठी निवासस्थाने उभारता येऊ शकतात. यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होऊ शकतो, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
‘आरोग्याच्या प्रश्नावर राजकारण बाजूला ठेवा’
मालवण तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या प्रश्नासाठी एकत्र यावे. नगरपरिषदेने एकमताने ठराव करून शासनास जागा उपलब्ध करून दिल्यास राज्य व केंद्र पातळीवरील नेत्यांच्या माध्यमातून ५० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असा विश्वास मसुरकर यांनी व्यक्त केला.
राजेंद्र मसुरकर यांनी गेल्या २६ वर्षांपासून आरोग्य व रुग्णसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगत, गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी मौल्यवान दागिने विकावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ शासकीय आरोग्यसेवा मिळावी, यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची मागणी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मालवण तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा हा प्रश्न गांभीर्याने घेऊन नगरपरिषदेने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि आरक्षित जागा शासनास उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी मसुरकर यांनी केली आहे.
