साळगाव महाविद्यालयात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यशाळा संपन्न..!
कुडाळ
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या माध्यमातून शनिवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा संपन्न झाली.कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक श्री. रमेश परब, जिल्हा आरोग्य निरीक्षक श्री. गणेश जाधव, जिल्हा PPM समन्वयक श्री. सुरेश मोरजकर, कुडाळ तालुका वरिष्ठ उपचार आरोग्य पर्यवेक्षक श्री. लक्ष्मण कदम तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती ईश्वरी पालन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्षयरोगग्रस्त व्यक्तींना समुपदेशन, त्यांच्या आरोग्याची काळजी आणि क्षयरोग निर्मूलनाच्या कार्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. महाविद्यालय स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सहभागी करून क्षयरोग निर्मूलनासाठी जनजागृती व प्रशिक्षण देण्याचा हा अभिनव उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून काम करावे, असे आवाहन केले. महाविद्यालयातील NSS स्वयंसेवकांच्या माध्यमातून क्षयरोगग्रस्त व्यक्तींना आवश्यक समुपदेशन, आरोग्यविषयक काळजी आणि समाजामध्ये क्षयरोगाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग घेतला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.यावेळी श्री. रमेश परब, श्री. सुरेश मोरजकर व श्री. लक्ष्मण कदम यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, उपचाराचे महत्त्व, क्षयरोगग्रस्त व्यक्तींशी करावयाचे योग्य व संवेदनशील वर्तन तसेच जनजागृतीमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत सखोल मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून क्षयरोग निर्मूलनासाठी देशभर विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोगाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक संवेदनशीलता आणि जनजागृतीची जबाबदारी याविषयी जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NSS कार्यक्रमाधिकारी प्रा. नितीन ढेकळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रामदास पास्ते यांनी केले.
