You are currently viewing सात थरांची सलामी देत राजापूरच्या गोविंदांनी फोडली मानाची दहीहंडी!
Oplus_16908288

सात थरांची सलामी देत राजापूरच्या गोविंदांनी फोडली मानाची दहीहंडी!

सावंतवाडीत संदीप गावडे यांच्या पुढाकारातून रंगला थरारक सोहळा; गोकुळ गोविंदा पथकाला १ लाख १ हजार १११ रुपयांचे पारितोषिक

सावंतवाडी :

ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा जल्लोष आणि दहीहंडी फोडण्यासाठी सुरू असलेली चुरस… अशा उत्साहपूर्ण वातावरणात सावंतवाडीतील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या पटांगणावर भव्य दहीहंडी उत्सव रंगला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आयोजित या सोहळ्यात राजापूर येथील गोकुळ गोविंदा पथकाने सात थरांचा मानवी मनोरा रचत मानाची दहीहंडी फोडली.

गोकुळ गोविंदा पथकाच्या या दैदिप्यमान कामगिरीसाठी १ लाख १ हजार १११ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. सात थर रचताना गोविंदांनी दाखवलेले कौशल्य पाहून उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा उत्साह वाढवला.

गेली कित्येक वर्षे संदीप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही या उत्सवाला मोठी रंगत आली. सावंतवाडीतील भटवाडी येथील महापुरुष मंडळाला दहीहंडी सोहळ्याचा पहिला मान देण्यात आला. त्यानंतर विविध गोविंदा पथकांनी आपली कौशल्यपूर्ण कामगिरी सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

या दहीहंडी सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले ते प्रसिद्ध अभिनेते कुशल बद्रिके यांच्या उपस्थितीचे. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात उत्साह आणखी वाढला.

कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, तसेच भाजप युवा नेते विनोद राऊळ, उपसभापती गौरव मुळीक, पंकज पेडणेकर, जितेंद्र गावकर, रवींद्र मडगावकर, मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, सागर ढोके, पंकज तुळसूलकर, अभिजीत धुरी, अनिकेत आसोलकर, चैतन्य सावंत, साईनाथ हनपाडे, अभिषेक लाखे, किसान धात्रे, अमित आसोलकर, विनेश तावडे, हितेन नाईक, लॉरेन्स डिसूझा, समीर नेमळेकर, आशिष यादव, साई सागम, रवी कलंगुटकर, हर्षल सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. गोविंदांच्या प्रत्येक थरासोबत वाढणारा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि उपस्थितांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. अखेर राजापूरच्या गोकुळ गोविंदा पथकाने सात थरांचा मनोरा उभारून दहीहंडी फोडत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

गोविंदांच्या थरारक कामगिरीने सावंतवाडीतील दहीहंडी उत्सवाला यंदा उत्साह आणि जल्लोषाची विशेष रंगत आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा