फोंडाघाटमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; बालगोपाळांनी फोडल्या १२ ते १५ हंड्या
पावसाची साथ; रंगपंचमीसह विविध पारंपरिक खेळांनी रंगला उत्सव — वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश
फोंडाघाट :
येथील दहीहंडी उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. श्री. राधाकृष्ण मंदिरापासून दहीहंडी उत्सवाची सुरुवात करण्यात आली. बालगोपाळांच्या उत्स्फूर्त सहभागाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
उत्सवादरम्यान दहीहंडी फोडण्याबरोबरच ओढाओढी, कबड्डी, लागोरी आदी विविध पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. बालगोपाळांनी उत्साहाने सहभाग घेत दहीहंडी फोडल्या. दिवसभरात जवळपास १२ ते १५ दहीहंड्या फोडण्यात आल्या.
यावेळी दहीहंडी उत्सवाला रंगपंचमीचीही जोड मिळाली. पावसाची रिमझिम सुरू असतानाच तरुणाईने रंगांची उधळण करत उत्सवाचा आनंद लुटला. डीजेच्या तालावर ‘रंग बरसे…’, ‘मखन का चोर…’ यांसारखी गाणी वाजत असल्याने वातावरण आणखी जल्लोषमय झाले.
उत्सवाच्या निमित्ताने समीर मांगले यांनी उपस्थितांना सुगंधी दूध व बिस्किटांचे वाटप केले. तसेच अश्विनी पेडणेकर यांनी कुरकुरे व थंड पेयांच्या बाटल्यांचे वाटप करून सहभागी बालगोपाळांचा उत्साह वाढविला.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली. त्यामुळे उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत आणि उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी पोलिस प्रशासनाच्या नियोजनाचे व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
फोंडाघाट परिसरातील नागरिक, तरुणाई आणि बालगोपाळांच्या मोठ्या सहभागामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव संस्मरणीय ठरला.
