बोर्डवेतील खड्डेमय रस्त्यांची तात्पुरती डागडुजी सुरू
गणपतीपूर्वी रस्ते दुरुस्तीच्या मागणीला यश; ग्रामस्थांच्या एकजुटीने प्रशासनाला जाग
बोर्डवे :
बोर्डवे गावातील खड्डेमय व खराब झालेल्या रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य महादेव राठवड यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे पत्रव्यवहार केला होता. गणपती उत्सवापूर्वी रस्त्यांची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी न झाल्यास आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.
या मागणीची दखल घेत संबंधित अधिकारी, प्रशासन आणि ग्रामपंचायतीने तात्काळ ठोस पावले उचलत बोर्डवे गावातील खराब झालेल्या रस्त्यांची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
ग्रामस्थांची गरज ओळखून बोर्डवेच्या सरपंचांनीही या कामासाठी पुढाकार घेतला. काम सुरू झाल्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य शरद साळवी, वैभव कारेकर, निलेश परब, एकावडे, शिंदे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून काम करून घेत आहेत.
तात्पुरत्या डागडुजीमुळे गणपती उत्सवाच्या काळात ग्रामस्थ व वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळणार असला, तरी गावातील रस्त्यांचे टिकाऊ, दर्जेदार आणि कायमस्वरूपी बांधकाम व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी ग्रामस्थांची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
रस्त्यांच्या प्रश्नाची दखल घेऊन तातडीने डागडुजीचे काम सुरू केल्याबद्दल संबंधित अधिकारी, प्रशासन, ग्रामपंचायत व सरपंच यांचे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले. तसेच या कामासाठी प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात आले.
ग्रामदेवता श्री मोराई व कालिका मातेचा जयघोष करत ग्रामस्थांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.
