*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रंग अनोखा..*
रंग अनोखा तुझा श्रावणा पाचूच हिरवा भरला
श्रीकृष्णाचे मोरपिस तू हरएक होतसे हळवा…
तूच रंगला जिकडेतिकडे म्हणतो हौस हो पुरवा
झुल्याझुल्यातून, आमराईतून सरसर येई शिरवा..
निळ्या नभातून बरसत येतो खेळत ऊनपाऊस
किती मिरवावे किती खेळावे फेडून घ्यावी हौस..
इंद्रधनूची कमान तुझी रे चाप शिवाचा आहे
क्षितिज व्यापतो रंगांची ती कसांडी वहात राहे..
फुले फुलवितो उद्यानातून वेली लेकुरवाळ्या
अंगावरती पहा मिरविती झोके घेती कळ्या..
मटकी चवळी मूग टरारे मुक्त ते फिरती वारे
अरे श्रावणा चटका लावून निघून जाशील का रे..
सणवारांची झुंबड आता फुटेल आनंदाचे पेव
बा श्रावणा खरोखर तू आनंदाची ठेव…
दरवर्षी तू असाच येतो हुरहुर लावून जातो
आषाढ सरता आम्हीच सारे चाहूल तुझी घेतो..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
