You are currently viewing आला भादव

आला भादव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

वृत्त:समुदितमदना + पर्वती

 

*आला भादव*

————————————-

 

अंगणामधे फुलल्या वेली कितीक नाना परी

अरे हा भादव आला घरी

 

पडल्या लोंब्या, सजली शेते, भरास आली पिके

सकाळी शहारणारे धुके

 

सुवर्णवर्खी किरणे पडली भिजून गेली धरा

वाहतो सोन्याचा हा झरा

 

इंद्रधनूची कमान सुंदर उन्हासोबती पडे

जणू हे रुपवतीचे कडे

 

प्राजक्ताची सजली झाडें घमघम करते जुई

पहाटे सजून गेली भुई

 

चमचमणारा थेंब दंवाचा गवतफुलावर झुले

छानसा रंग तयाचा खुले

 

गणरायाचे स्वागत करण्या सजल्या साऱ्या बिदी

भादवी फुसांडणारी नदी

 

श्रीनिवास गडकरी

बावधन पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा