कुडाळमध्ये दुचाकी थेट भंगसाळ नदीपात्रात; मायलेक जखमी
शेलटेवाडीतील ग्रामस्थांची तत्परता; दोघांचेही प्राण वाचविण्यात यश
कुडाळ :
शहरातील हॉटेल गुलमोहोरजवळील भंगसाळ नदीवरील बंधाऱ्यावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील आई आणि मुलगा पाण्यात पडून जखमी झाले. मात्र, शेलटेवाडीतील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तातडीने बचावकार्य केल्याने दोघांचेही प्राण वाचले. जखमी मायलेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बंधाऱ्यावरील कामादरम्यान दुर्घटना
भंगसाळ बंधाऱ्यावर पाणी साठविण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून लोखंडी प्लेट्स बसविण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी आणलेल्या प्लेट्स बंधाऱ्यावर ठेवण्यात आल्या होत्या. याच मार्गावरून दुचाकी जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली. त्यामुळे दुचाकीवरील आई आणि मुलगा पाण्यात पडले.
ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
दुचाकी नदीत कोसळल्याचे लक्षात येताच शेलटेवाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून पाण्यात पडलेल्या मायलेकांना बाहेर काढले. दोघेही जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. नदीपात्रात पडलेली दुचाकीही बाहेर काढण्यात आली.
कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
भंगसाळ बंधाऱ्यावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. याबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
