*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वृत्त: दासी*
*वळवाची सर आली*
———————————
सर आली वळवाची अंग अंग मोहरले
जलधारी भिजताना रोम रोम थरथरले
वैशाखी वणव्याने जळते ही वसुंधरा
हलते ना पान कुठे स्तब्ध जशी यशोधरा
थंडगार पवनगती मन माझे शहारले
जलधारी भिजताना रोम रोम थरथरले
पळसाची लाल फुले,चाफ्याला बहर नवे
फुललेल्या बकुळीवर पक्षांचे लक्ष थवे
वळवाची सर जेथे मन माझे भिरभिरले
जलधारी भिजताना रोम रोम थरथरले
धसमुसळ्या वाऱ्याने भान जरा सुटलेले
काळोख्या आडोशी कुणी काय लुटलेले
अजून ते आठवता मन माझे फुलारते
जलधारी भिजताना रोम रोम थरथरते
श्रीनिवास गडकरी
पुणे
