कोल्हापूर (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शहर व करवीर तालुका शाखेच्या वतीने आयोजित ‘आम्ही सारे दाभोलकर’ कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मेळाव्यास १०० हून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांचा लक्षणीय सहभाग हे मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले.
मेळाव्यास समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी मूल्यांसाठी लढणारे शहीद डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यात विविध क्षेत्रांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक व्यापक व प्रभावी करण्याचा, तसेच शाळा आणि महाविद्यालयांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार आणि विवेकवाद रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
आजच्या काळातील अंधश्रद्धेची बदलती रूपे, तरुणाईपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे विचार पोहोचवण्याचे मार्ग, विज्ञान शिक्षण आणि समाजातील विवेकवादी हस्तक्षेप यांसारख्या विषयांवर मेळाव्यात संवाद व गटचर्चा घेण्यात आल्या.
मेळाव्याचे स्वागत रामदास देसाई यांनी केले, तर प्रास्ताविक राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी केले. संवाद सत्राचे संचालन स्वाती कृष्णात, रेश्मा खाडे, मानसी बोळूरे, प्रमोद शिंदे आणि हरी आवळे यांनी केले. करवीर शाखेचे कार्याध्यक्ष दिलीप कांबळे यांनी आभार मानले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी राहुल शिंगे, आविष्कार कांबळे, शुभांगी कांबळे, महादेवी शिंदे, राहुल सुतार, प्रवीण गाठ, मुक्ता निशांत, निशांत सुनंदा विश्वास आणि सचिन मंगल यांनी विशेष प्रयत्न केले.
