सातारा (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
“प्राथमिक शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही क्षेत्रात सातारा जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर राहावा, यासाठी माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या योजनांतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देऊन ही कामे डिसेंबर अखेर पूर्ण करावीत,” असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
माझी शाळा आदर्श शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमांतर्गत सुरु असलेल्या कामांचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणावर विशेष भर द्यावा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, “जिल्ह्यातील सर्व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे व आदर्श शाळा सौर ऊर्जेवर कार्यरत करण्यात यावीत जेणेकरून वीजपुरवठ्याची अडचण भासणार नाही.” ज्या आदर्श शाळा पूर्ण झाले आहे अशा शाळांची गट शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या गटातील स्मार्ट शाळांना पंधरा दिवसात भेट द्यावी आणि पहाणी करावी. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद हद्दीत दर वर्षी एक शाळा आदर्श शाळा जिल्हा वार्षिक योजनेतून उभारण्यात यावी, अशाही सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षण व सार्वजनिक आरोग्यावर भर दिला आहे. माझी शाळा आदर्श शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध आहे. कामे गतीने होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक 15 दिवसांनी आढावा घ्यावा. या दोन्ही योजना जिल्ह्यात प्रभावी राबविण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून निश्चित केलेल्या मुदतीत कामे पूर्ण करुन जिल्ह्याला शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अव्वल स्थानी नेण्यासाठी काम करावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
