देशी गोवंश गोशाळा गोपालक संघ सिंधुदुर्गची स्थापना
श्री. पुरुषोत्तम (काका) ओगले यांच्या पुढाकाराने संघटित प्रयत्न; देशी गोवंश संवर्धनासाठी भक्कम व्यासपीठ
सिंधुदुर्ग :
देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व संगोपन करणाऱ्या गोशाळा तसेच गोपालकांना संघटित करून त्यांच्या विविध प्रश्नांना शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी ‘देशी गोवंश गोशाळा गोपालक संघ, सिंधुदुर्ग’ या संघाची आज स्थापना करण्यात आली.
संघाच्या स्थापनेसाठी श्री. पुरुषोत्तम (काका) ओगले यांनी पुढाकार घेतला. यावेळी संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी
अध्यक्ष : श्री. पुरुषोत्तम जनार्दन ओगले, देवगड
कार्याध्यक्ष : श्री. महेश रामदास संसारे, वैभववाडी
उपाध्यक्ष : श्री. प्रफुल्ल प्रकाश पवार, वैभववाडी
उपाध्यक्ष : श्री. नारायण आत्माराम सिद्धये, दोडामार्ग
कार्यवाह : श्रीमती सुवर्णा सुरेश रावराणे
सहकार्यवाह : श्री. चैतन्य रविंद्र सावंत, कुडाळ
खजिनदार : श्री. दिवाकर विठ्ठल ठाकूर, फोंडा
सदस्य : श्री. स्वागत रघुवीर नाटेकर, सावंतवाडी
सदस्य : श्री. भालचंद्र पुनाजी परब, मालवण
सदस्य : श्री. धनंजय अनंत प्रभुदेसाई, कणकवली
सदस्य : श्री. नितीन गोपाळकृष्ण लिंगोजी, वेंगुर्ला
देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमांना चालना देणे, गोशाळा व गोपालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच देशी गोवंश आधारित शेती, दुग्धव्यवसाय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, हा संघाचा प्रमुख उद्देश आहे.
तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ गोशाळा व देशी गोपालकांना मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
गोशाळांना आवश्यक असलेली शासकीय मदत, पशुधन संवर्धन, चारा, पशुवैद्यकीय सुविधा, प्रशिक्षण तसेच विविध अनुदान योजनांची माहिती गोपालकांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंशाचे संगोपन व संवर्धन करणाऱ्या सर्व गोपालकांनी संघटनेत सहभागी होऊन एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
देशी गोवंशाचे संरक्षण ही केवळ पशुधन संवर्धनाची बाब नसून शेती, पर्यावरण, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पारंपरिक जीवनपद्धतीच्या संवर्धनाशी जोडलेली चळवळ आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार देशी गोवंश गोशाळा गोपालक संघाच्या माध्यमातून करण्यात आला.
