*घारपी शाळेचे विद्यार्थी शेतीच्या बांधावर*
*एक दिवस बळीराज्यासाठी… आपल्या अन्नदात्यासाठी उपक्रम उत्साहात*
*बांदा*
*”बिनभिंतीची उघडी शाळा…* *लाखो इथले गुरू!”*
या ओळींचा प्रत्यय सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे आला. वर्गखोलीच्या चार भिंती ओलांडून विद्यार्थी जेव्हा हिरव्यागार भातशेतीच्या बांधावर पोहोचले, तेव्हा निसर्गच त्यांचा शिक्षक झाला आणि कष्टकरी शेतकरीच त्यांच्या जीवनशाळेतील गुरू ठरले. “बांधावरची शाळा – एक दिवसीय शेतकऱ्यांसाठी… आपल्या अन्नदात्यासाठी” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय अनुभव ठरला.
रिमझिम पावसाच्या साक्षीने, हिरव्यागार शेतांच्या कुशीत भरलेल्या या बिनभिंतीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी भातलागवडीचे बारकावे, शेतीतील मेहनत, ऋतूचक्राशी असलेले नाते आणि अन्ननिर्मितीचा अखंड प्रवास प्रत्यक्ष अनुभवला. हातात पुस्तक नव्हते; पण प्रत्येक रोप, प्रत्येक मातीचा कण आणि प्रत्येक घामाचा थेंब विद्यार्थ्यांना जीवनाचा नवा धडा शिकवत होता.
विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत त्यांच्या संघर्षमय आयुष्याची, बदलत्या हवामानाशी सुरू असलेल्या झुंजीची आणि अन्न पिकविण्यामागील अथक परिश्रमांची माहिती जाणून घेतली. या संवादातून अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अन्नदात्याबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली.
यानंतर निसर्गाच्या सान्निध्यात सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. शेतात उगवलेल्या धान्याचा घास ताटात येईपर्यंत शेतकरी किती कष्ट उपसतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना मनापासून झाली. “अन्नाचा प्रत्येक कण हा शेतकऱ्याच्या घामाचा प्रसाद आहे,” हा संदेश त्यांनी कृतीतून आत्मसात केला.
मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी सांगितले, “शाळेत पुस्तके ज्ञान देतात; पण जीवनाचे खरे शिक्षण निसर्ग आणि समाज देतो. विद्यार्थ्यांनी अन्नदात्याच्या कष्टांचा सन्मान करावा, श्रमाला प्रतिष्ठा द्यावी आणि अन्नाचा अपव्यय टाळावा, हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे.”
उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकारी शिक्षक आशिष तांदुळे आणि धर्मराज खंडागळे यांनी मोलाचे योगदान दिले. पालक, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करून त्यांना शेतीचे प्रत्यक्ष धडे दिले. या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर उपाध्यक्ष यशोदा गावडे, प्रगतशील शेतकरी उत्तम कविटकर,शरद गावडे ,पालक सहदेव गावडे, संतोष कविटकर, वासुदेव नाईक, यशोदा गावडे, संजना गावडे,रिया कविटकर, रुपाली कविटकर, समृद्धी गावडे अंगणवाडी सेविका संजना गावकर मदतनीस अमृता कविटकर ,संचिता सावंत आदि उपस्थित होते.
ज्ञान, संस्कार, श्रमप्रतिष्ठा आणि निसर्गप्रेम यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांच्या हृदयाला स्पर्शून गेला. त्या दिवशी शेताच्या बांधावर फक्त शाळाच भरली नव्हती; तर विद्यार्थ्यांच्या मनात अन्नदात्याविषयी आदर, कृतज्ञता आणि माणुसकीची बीजेही कायमची रुजली.
