चिखली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
“केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत पन्नास रुपये प्रतिकिलो केल्याशिवाय व इथेनॉल, स्पिरीट आदी उपपदार्थांचे अस्थिर दर स्थिर ठेवल्याशिवाय अडचणीतून वाटचाल करणारा साखर उद्योग टिकणार नाही,” असे प्रतिपादन अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.
प्रेसमड च सांडपाण्यावर प्रक्रिया करून प्रतिदिनी दहा टन कॉप्रेस्ड बायोगॅस (सी. बी. जी.) निर्मिती करणारा प्रकल्प उभारणार आहे, अशी माहिती या निमित्ताने दिली.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरूडकर व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थित होते.
ते म्हणाले, “साखर उद्योगापुढे आर्थिक अडचणींच्या संकटातून जात आहे. शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी साखरेच्या विक्री दरात वाढ करून इथेनॉल, स्पिरिट आदी उपपदार्थांच्या किमती स्थिर ठेवल्या पाहिजेत. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन चार महिने उलटले तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आपला कारखाना गतवर्षी कारखाना केवळ शंभर दिवस चालला. सर्वच कारखाने आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. साखरेच्या दरात स्थिरता नसल्याने कारखान्यांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होत आहे. साखरेच्या दरवाढीबाबत साखर कारखान्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे जाऊन केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी आठ दिवसांत साखर व इथेनॉलच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र चार महिने झाले तरी निर्णय झालेला नाही.”
ते पुढे म्हणाले, कारखान्याने तब्बल ५ लाख ५० हजार क्विंटल साखर जुन्या दराने विकली. त्यानंतर साखरेच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली. मात्र ही दरवाढ अस्थिर ठरली असून, व्यापारी निविदा भरण्यास तयार नसल्याने साखर विक्रीत अडचणी निर्माण होत आहेत. कारखान्याने २० हजार क्विंटल साखर विक्री केली; व्यापाऱ्यांनी पैसे भरूनही साखर उचलली नसल्याने कारखान्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. आता पुन्हा साखरेचे दर खाली येत आहेत. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने साखरेच्या दरात अपेक्षित वाढ केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर देणे कारखान्यांसाठी कठीण होत आहे. साखरेचे दर वाढल्यानंतर सरकारने साखर निर्यातीचा निर्णय घेतला. मात्र या धोरणाचा फायदा उद्योजकांना होत असताना ग्रामीण भागातील बळीराजा आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी सरकारने ठोस धोरणे राबविण्याची गरज असून, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आवश्यक आहे.”
माजी राज्यमंत्री श्री. शिवाजीराव नाईक म्हणाले, अध्यक्ष मानसिंगभाऊ यांच्या नेतृत्वाखालील विश्वास कारखान्याने मोठी प्रगती साधली आहे. विविध उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांची उभारणी केली आहे. साखर कारखानदारी समोर अडचणी असतानाही त्यांनी ‘विश्वास’ कारखान्याची वाटचाल नियोजनपूर्वक सुरू ठेवली आहे. कारखान्यासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून आदर्शवत काम करत आहेत. शेतकरी हिताच्या विविध योजना राबविल्या आहेत. ठेवीमध्ये व कर्ज वितरणामध्ये वाढ करत पारदर्शकता ठेवली आहे. त्यांच्या पाठोपाठ कारखान्याचे संचालक असलेले युवा नेतृत्व विराज नाईक यांचेही काम आदर्शवत आहे.”
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. स्वागत व प्रास्ताविक संचालक विजयराव नलवडे यांनी केले. कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी सभेपुढील विषय पत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्दे व शंकांबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी समाधानकारक उत्तरे दिली. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, माजी संचालक रणजितसिंह नाईक यांच्यासह संचालक सर्वश्री. विराज नाईक, बाबासो पाटील, सुरेश पाटील, यशवंत निकम, विष्णू पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, यशवंत दळवी, तुकाराम पाटील, ॲड. अजित पाटील, बाळासो पाटील, सुहास पाटील, बिरू आंबरे, संदीप तडाखे, सुरेश चव्हाण, आनंदा पाटील, सुकुमार पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कोंडिबा चौगुले, यांच्यासह सभासद, खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते. आभार विश्वास पाटील यांनी मानले.
कर्ज बुडव्यांना प्रोत्साहन मिळेल.
सांगली जिल्हा बँकांचा अध्यक्ष म्हणून काम करताना आपण नेहमीच शेतकरी हिताचा विचार केला. थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी देण्यापेक्षा कर्ज फेडीची शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. उद्योजकांच्या कर्ज माफीबाबत सरकार मेहेरबान राहते; मात्र कर्जबुडव्यांना प्रोत्साहन मिळेल अशी धोरणे राबवू नयेत, अशी स्पष्ट भूमिका मानसिंगराव नाईक यांनी मांडली.
