You are currently viewing नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका सौ. प्रतिभा चोथे यांचे निवेदन 

नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका सौ. प्रतिभा चोथे यांचे निवेदन 

विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

शहरात काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसून नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. अशा आशयाचे निवेदन माजी उपनगराध्यक्षा सौ. प्रतिभा चोथे यांनी विटा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की कदम वस्ती, बोडरे वस्ती, लेंगरे रोड परिसर येथे गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी ८ते 10 दिवसांपासून, तर काही भागात ४-४ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित आहे.

टँकरद्वारे केली जाणारी तात्पुरती व्यवस्था नागरिकांची गरज पूर्ण करण्यास अपुरी ठरत आहे. पाईपलाईन फुटणे, दुरुस्तीस होणारा विलंब, अनियमित वेळापत्रक आणि पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन नसणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

पूर्वीच्या काळात विटा शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि नागरिकांना दिलेली सेवा नागरिक आजही आठवतात. काळ बदलला, सत्तेची जबाबदारी बदलली; मात्र नागरिकांच्या मूलभूत गरजा अधिकच त्रासाच्या झाल्या आहेत आज नागरिक स्वतःहून जुन्या कामांची आठवण काढत आहेत, हीच आमच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे कोणावर व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा आजच्या प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देऊन व्यवस्था सुधारावी, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.

निवेदनात त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत.

तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करावा. फुटलेल्या पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करावी. निश्चित आणि नियमित पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पुरेशा प्रमाणात टँकर उपलब्ध करून द्यावेत.

वारंवार उद्भवणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

पाणी ही कृपा नाही; नागरिकांची मूलभूत गरज आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांना नियमित, पुरेसा आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा