पणदूर तिठ्यावर २ कोटी ३७ लाखांचे अंबरग्रीस जप्त; चौघे ताब्यात
२ किलो ३७३ ग्रॅम व्हेल माशाच्या उलटीसह वाहनांसह २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
कुडाळ :
मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथे प्रतिबंधित व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) बाळगून वाहतूक करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. शनिवारी सायंकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तब्बल २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये आहे. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांविरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर अधिनियमातील कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८ आणि ५१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दिपक शेलार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोजा, आशीष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अंबरग्रीस प्रकरणामुळे सिंधुदुर्गात खळबळ
व्हेल माशापासून मिळणाऱ्या अंबरग्रीसच्या बेकायदा तस्करीविरोधात पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेल्या अंबरग्रीसचा स्रोत आणि त्यामागील व्यवहाराबाबत पुढील तपास सुरू आहे.
