‘गजर माऊलीचा, सोहळा आनंदाचा’ने शिरोड्यात दुमदुमला वारकरी दिंडी सोहळा
रामपुरुष मंदिरापासून माऊली मंदिरापर्यंत भक्तिमय वातावरणात दिंडी; कोकणातील जुनी वारकरी परंपरा आजही जिवंत
शिरोडा :
श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान, शिरोडा येथे आयोजित ‘गजर माऊलीचा, सोहळा आनंदाचा’ अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त वारकरी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. रामपुरुष मंदिरापासून शिरोडा येथील माऊली मंदिरापर्यंत पारंपरिक पद्धतीने ही दिंडी काढण्यात आली.
दिंडीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी मंडळी सहभागी झाली होती. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात दिंडी माऊली मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी वारकरी मंडळींमध्ये मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
या दिंडी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध पारंपरिक सोंगांनी सजलेले कलाकार. विविध प्रकारची सोंगे नटवून सहभागी झालेल्या कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यातून कोकणातील लोकपरंपरा, भक्ती आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडले.
वारकरी संप्रदायाची ही जुनी परंपरा आजही कोकणात जपली जात असल्याचे या दिंडी सोहळ्यातून दिसून आले. श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम घडविणाऱ्या या दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण शिरोडा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
