You are currently viewing निखळ सुखाचा श्‍वास

निखळ सुखाचा श्‍वास

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित लघुलेख*

 

******

*निखळ सुखाचा श्‍वास*

 

“आता मी काय करू ?” असं निवांतपण नसावंच.

अष्टौप्रहर आपलं मन नित्य कशात ना कशात गुंतून गुरफटून असावं.

 

अविरत व्यस्त रहावं,

दिवसभर पुरून उरेल एवढं काम आपणच काढून ठेवावं.

 

एक काम झालं की दुसरं ! ते झालं की तिसरं मग पुढचं !

ही शृंखला संपू नये कधीच !

 

स्वतःला कामाच्या चौकटीत घट्ट करकचून बांधून घेऊन मस्त शिस्तीत जगावं !

मग या जगण्याची मजा काही और असते.

दिवस संपला पण काम संपलं नाही.

असं रोज वाटलं पाहिजे.

उद्यासाठी कामाची सुरुवात करून ठेवली आहे. या समाधानात झोपही छान लागते.

 

एकवेळ नशीब आपल्या हातात नाही. असं म्हणू शकतो आपण ! पण आपला दिवस कोणत्या गोष्टीत कसा घालवायचा ?..हे तर निश्चित आपल्याच हातात आहे.

 

रोजची सकाळ आपल्या ओंजळीत एक अख्खा दिवस ठेवत असते. चोवीस तासांचे दान पदरात टाकत असते. तिचा विनियोग कसा करायचा ?

..हे आपल्याच तर हातात असते.

 

‘आराम जास्त म्हणजे सुख जास्त’ असं मुळीच नसतं.

उलट “जेवढं काम जास्त, तेवढं समाधान जास्त”!

असंच ते समीकरण असतं.

 

जीवनाचं नंदनवन करण्याचा एकच एक मार्ग आहे. आणि तो म्हणजे अफाट श्रम !

 

कठोर परिश्रमातून यशप्राप्‍ती होतेच होते. शिवाय

आपल्याला सुखाचे दिवस दाखवते. तोंडातला घास समाधानाचा करते.

 

म्हणूनच आपण सतत अनवरत अविरत प्रचंड कामात, कधीच न संपणाऱ्या अशा कार्यात गुंतून रहायला हवं.

अखंड प्रयत्नात बुडून जायला हवं.

 

कलेत मन रमवा अथवा कामात जीव गुंतवा. इतका की स्वत:बद्दल विचार करायला, जीवनातील त्रुटी आठवायलाही वेळ मिळू नये.

मग कसलेही जीवन असो. ते अगदी सहज सुसह्य होऊन जाते.

 

स्वप्नातलं फुलपाखरू जागं करा

मनातलं स्वप्न साकार करा.

नवनव्या उपक्रमात वाहून घ्या आणि मग खुशाल

निखळ सुखाचा श्वास घ्या.

 

डॅा.शरयू शहा,मुंबई.

9619023330

॰॰॰॰॰॰॰॰॰

प्रतिक्रिया व्यक्त करा