You are currently viewing बदलता गणेशोत्सव : एक दृष्टिक्षेप
Oplus_16908288

बदलता गणेशोत्सव : एक दृष्टिक्षेप

जीवनात बदल अपेक्षित असतात. खरं तर जीवनाचे दुसरे नाव बदल असते. काळानुरूप बदलाचे वारे वहात असते. काळाच्या ओघात बदलणे ही मानवी प्रवृत्ती आहे. मात्र हे बदल होत असताना मूळ उद्देश बाजूला जाता कामा नये. याची आपणास कटाक्षाने दक्षता घ्यावी लागते. कोणत्याही क्षेत्रातील बदल हे मुळात स्वागतार्हच असतात. उलट बदल झाला नाही तर तोच तो पणाचा धोका संभवतो. आपले सण उत्सव देखील त्याला अपवाद राहिलेले नाहीत. अगदी गणेशोत्सव साजरा करण्याचे उदाहरण विचारात घ्या. लोकमान्य टिळकांच्या काळातील गणेशोत्सव व आजचा गणेशोत्सव किती तफावत पहावयास मिळते.

लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला तो एका उदात्त हेतूने. त्यांना स्वराज्यप्राप्ती साठी समाजमन तयार करावयाचे होते. लोकांना संघटित करून त्यांच्यात जागृती निर्माण करावयाची होती. त्या काळात घराबाहेर न पडणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी प्रवृत्त करावयाचे होते. प्रबोधनातून जनजागृती हा त्यामागचा उद्देश होता. लोकांना एकत्र जमविण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव सारख्या सणांचा उपयोग करून घेतला. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी लोकांना एकत्र करून त्यांच्यात सजीव देखावे माध्यमातून जनजागृती केली.

काळ बदलला. बदलत्या काळानुसार गणेशोत्सव साजरा करण्याचा कल्पना देखील बदलल्या. एक करमणुकीचे आनंदोत्सवाचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यात डॉल्बीचा शिरकाव झाला. ढोल पथक, झांज पथक, लेझीम यांचा गलबला सुरू झाला. आवाजाच्या तीव्रतेने लोकांच्या श्रवण प्रक्रियेवर परिणाम होऊ लागला. त्यासाठी न्यायालयात जाऊन आवाजाची तीव्रता निश्चित करावी लागली. हळूहळू त्यात आता पुन्हा वाढ होऊ लागली.

या दहा दिवसांच्या कालावधीत करमणूक व त्याचबरोबर प्रबोधन हा वसा काही गणेशोत्सव मंडळांनी मात्र अव्याहतपणे जपला आहे. काही ठिकाणी सजीव देखाव्यांच्या माध्यमातून पौराणिक, धार्मिक परंपरा जोपासल्या जात आहेत. साधू संतांची जीवनगाथा समाजासमोर ठेवली जात आहे. डिजिटलायझेशनचा वापर करून अत्याधुनिक तंत्रज्ञान लोकांसमोर आणले जात आहे. हे सारे बदल निश्चित पणे स्वागतार्ह आहेत. त्याबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.

आगमन व विसर्जन मिरवणुकीतील काही प्रकार मात्र टाळले गेले पाहिजेत. गुलाल, चिरमुरे यांची उधळण करणे, मध्यप्राशन करून हिडीस प्रकारचे नाचकाम करणे थांबलेच पाहिजे. यातून समाजासमोर आपण कोणता आदर्श ठेवतो हा खरा प्रश्न आहे. आजकाल गणेशोत्सव राजकारणाच्या गर्तेत सापडत चालला आहे. शक्ती प्रदर्शनाच्या नावाखाली आपण कोणत्या थराला जातो याचे भान काही मंडळींना रहात नाही मग आपल्याच सण उत्सवावर टीकेचा भडिमार होतो. हे टाळता येणे शक्य नाही का?

या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, व्याख्यानमाला, विविध स्पर्धा आदी उपक्रमाचे आयोजन करू शकतात. काही ठिकाणी तसे प्रयत्न देखील सुरू आहेत. गणपती ही विध्येची आराध्य देवता आहे. त्यामुळे आपल्यात सुसंस्कृत पणा आलाच पाहिजे. ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांची रेलचेल करण्यापेक्षा एक गाव एक गणपती ही योजना राबवली गेली पाहिजे. नदी, ओढे, विहिरी येथे गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्वी केले जायचे. मात्र आजकाल समाजात जागृती निर्माण झाली आहे. गावागावात मोठ्या काहिली ठेवून त्यात गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे जलप्रदूषण कमी होत आहे. या दहा दिवसांच्या काळात धार्मिक वातावरण तयार झालेले असते. आजकाल सर्वधर्मीय गणेशोत्सव मंडळे पहावयास मिळत आहेत. ऐक्य भावना त्यामुळे वाढीस लागत आहे. गणेशोत्सव साजरा करण्याच्या बाबतीत अगदीच फार मोठा बदल झाला आहे असे नाही. मात्र जो बदल होतोय तो विधायक स्वरूपाचा आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा, सामाजिक ऐक्य वाढीस लावणारा, लोकजागृती करणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे. तो होत आहे यातच आपण परंपरा राखण्यात यशस्वी झालो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सवाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. बहुतांशी सण श्रावण महिन्यात असतात. त्यामुळे त्याला एक वेगळेपण लाभले आहे. या सर्व सण उत्सवा मागची भूमिका आपण जाणून घेतली तर बरेच काही जीवनात शिकलो असे मानावे लागेल. मोहरमला जसे आज हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते तीच भावना गणेशोत्सवाच्या बाबतीत तयार होताना दिसत आहे. मोहरम मध्ये जसा हिंदू धर्मीय लोकांचा सहभाग असतो तसा गणेशोत्सव मध्ये मुस्लिम धर्मियांचा असतो. शेवटी सण समारंभ उत्सव साजरे कशासाठी करायचे तर त्यातून काहीतरी शिकता यावे. काहीतरी बोध घेता यावा. जीवनाला नवी उभारी मिळावी. नवी दिशा मिळावी .

दहा दिवस लोक गणपतीसमोर आरतीसाठी येतात. कधी नव्हे ते जोरजोरात टाळ्या वाजवतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराला मिळते हा मोठा फायदा नाही का? त्यामुळे गणेशोत्सव स्वरूप कितीही बदलले तरी तो व्यापक प्रमाणात साजरा झाला पाहिजे या मताचा मी आहे. काही वर्षांपूर्वी सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे महापूर आला होता. सारे जीवनच उध्वस्त झाले होते . अनेकांचे संसार नष्ट झाले होते . यापुढील काळात जगायचे कसे ही विवंचना त्यांच्यापुढे निर्माण झाली होती . अशा परिस्थितीत गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून महापुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबाला मदत करणे आपले आद्य कर्तव्य समजले गेले . काही गणेश मंडळांनी त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेतले होते . शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता . शासन स्तरावर ठिकठिकाणी बैठका घेऊन लोकात मतपरिवर्तन केले जात होते .

सध्या गणेशोत्सव तयारीला वेग आला आहे. सार्वजनिक मंडळे त्यात व्यस्त आहेत. मंडळानी मंडप उभारणी, विद्युत रोषणाई व देखावे सादर करताना दक्षता बाळगणे गरजेचे आहे. सुरक्षा नियम पाळणे गरजेचे आहे. प्रत्येक गणेशोत्सव मंडळानी आत जाण्याचा व बाहेर येण्याचा असे दोन मार्ग ठेवावेत. गर्दीवर नियंत्रण राखण्या साठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. इको गणपती प्रतिष्ठापना करण्याकडे बहुतेक जणांचा कल आहे. त्याच्या कार्यशाळा देखील झालेल्या आहेत. नदी, ओढे, तलाव कसे स्वच्छ राहतील याकडे देखील लक्ष पुरवले जात आहे.

या वर्षी अनेक बंधने शिथिल केल्याने लोकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गणरायाचे आगमन झाले की घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. दहा दिवस कसे जातात हेच समजत नाही. या कालावधीत प्रत्येक माणूस आपले दुःख यातना विसरून जातो. कुंभार वाड्यात गणपतीच्या असंख्य मूर्ती तयार केलेल्या आहेत. आसनावर विराजमान झालेल्या मूर्तीला विशेष मागणी आहे. यंदा गणरायाच्या मूर्तीच्या किमतीत देखील वाढ झालेली आहे.

प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार विटा

भ्रमणभाष- 9881157709

प्रतिक्रिया व्यक्त करा