You are currently viewing गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महापालिका सज्ज

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महापालिका सज्ज

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आगामी श्रीगणेशोत्सव २०२६ अत्यंत उत्साहात आणि सुसंवादाने साजरा करण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय तयारीला वेग आला आहे.

प्रति वर्षा प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध सोयी-सुविधा, वाहतूक कोंडी निवारण, कायदा व सुव्यवस्था तसेच अन्य तातडीच्या विषयांवर नियोजन करण्यासाठी सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरातील सर्व गणेश मंडळे, सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

सांगली व कुपवाड शहर बैठक महापौर श्री. धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता पद्मभूषण डॉ. वसंतराव दादा पाटील सभागृह (मा. महासभा हॉल), महापालिका मुख्यालय, सांगली येथे होणार आहे.

मिरज शहरातील बैठक महापौर श्री. धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता बालगंधर्व नाट्यगृह, मिरज येथे होणार आहे.

उत्सव काळात नागरिकांना व गणेशभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच यंत्रणा सतर्क केली आहे. या बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून अंमलबजावणीचे आदेश दिले जाणार आहेत:

रस्ते व पायाभूत सुविधा: खराब रस्त्यांचे तातडीने मुरुमीकरण करणे व खड्डे बुजवणे.

मिरवणूक मार्ग सुरक्षा: मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे (सावळणे) आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करणे.

स्वच्छता व आरोग्य: उत्सवादरम्यान शहरात आणि मंडप परिसरात दैनंदिन स्वच्छता उत्तम राखणे.

सोयी-सुविधा व कायदा सुव्यवस्था: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करणे आणि शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस व प्रशासन समन्वय साधणे.

या बैठकीत तातडीने निर्णय घेऊन योग्य त्या कार्यवाहीची अंमलबजावणी करण्यासाठी शहर अभियंता, उद्यान अधीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, विद्युत अभियंता, सहायक आयुक्त, नगर अभियंता आणि कनिष्ठ अभियंता आदी संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

 

सांगली, मिरज व कुपवाड शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांनी आपल्या भागातील निर्धारित वेळेनुसार आणि ठिकाणी या महत्त्वपूर्ण बैठकीस स्वतः किंवा आपल्या मंडळाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

उत्सव काळात सांगली-मिरज- कुपवाड शहरात धार्मिक व सामाजिक सलोखा कायम राखत गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा