You are currently viewing सरकारने कर्जमाफी करण्याअगोदर जिल्हा बँक मदतीला धावली : निलेश राणे

सरकारने कर्जमाफी करण्याअगोदर जिल्हा बँक मदतीला धावली : निलेश राणे

महाराष्ट्रात हे पहिले उदाहरण; सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवींना

जिल्हा बँकेच्या नेरूर शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर

कुडाळ : मागील कर्जमाफीच्या काळात सरकारने कर्जमाफी जाहीर करण्याअगोदरच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेली. महाराष्ट्रात हे पहिले उदाहरण असून, बँक पहिली धावली आणि त्यानंतर सरकारने मदत घोषित केली, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी नेरूर येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेरूर शाखा कार्यालयाचे नूतन वास्तूत स्थलांतर मंगळवारी सायंकाळी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. नेरूर देऊळवाडा येथील बापू सडवेलकर यांच्या इमारतीत हे शाखा कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना निलेश राणे यांनी जिल्हा बँकेच्या गेल्या पाच वर्षांतील प्रगतीचे कौतुक केले. राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बँकेला कुठेही डाग लागू न देता प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे काम अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. राणेसाहेबांना जे अभिप्रेत होते, त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने बँकेचे कामकाज सांभाळले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रामाणिकपणे बँकेचा कारभार सांभाळत बँकेला लावलेली शिस्त आज नफ्याच्या रूपात दिसून येत आहे. ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेतले जात असून, बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवी यांना जाते, असेही निलेश राणे म्हणाले. ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले की, सामान्य शेतकरी आणि ग्राहकांपर्यंत बँक पोहोचली पाहिजे, तसेच बँकेत आल्यानंतर ग्राहकाला समाधान मिळाले पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. ग्राहकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

आमच्या कार्यकाळातील पाच वर्षांत बँकेने ८ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. ग्राहकांनी आमच्यावर विश्वास ठेवून साथ दिली आहे. त्यामुळे त्यांच्या सोयी-सुविधा बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे ही आमची बांधिलकी असल्याचे दळवी यांनी सांगितले.

निलेश राणे यांनी मतदारसंघातील ज्या-ज्या शाखांचे उद्घाटन केले, त्या सर्व शाखांची प्रगती झाली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे कामकाज सुरू असल्याचेही मनीष दळवी यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोरे, विद्याप्रसाद बांदेकर, सौ. नीता राणे, संदीप परब, व्हीक्टर डान्टस, रवींद्र मडगावकर, केशव नारकर, कुडाळ खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष, सौ. भक्ती घाडीगावकर सरपंच नेरूर, सौ. स्वाती करलकर सरपंच कवठी, राजेश प्रभू सरपंच वालावल, मंगेश बांदेकर अध्यक्ष महादेव विकास संस्था कवठी, सुनील नाईक अध्यक्ष चिंदवन विकास संस्था, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, नेरूर शाखा व्यवस्थापक सौ. युगा पेडणेकर, बँक अधिकारी श्याम सरमळकर, निलेश कनयाळकर यांच्यासह बँकेचे ग्राहक व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बँकेच्या वतीने नूतन शाखेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जागामालक बापू सडवेलकर यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा