हेत खिंड–भुईबावडा-पहिलीवाडी रस्ता महिनाभरातच उखडला; कार्यकारी अभियंत्यांकडून प्रत्यक्ष पाहणी
वैभववाडी : मौजे हेत खिंड ते भुईबावडा-पहिलीवाडी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी अरुणा मध्यम पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
हेत खिंड ते भुईबावडा-पहिलीवाडी हा सुमारे १.५ किलोमीटर लांबीचा रस्ता असून, मे २०२६ मध्ये करण्यात आलेले हे काम अवघ्या महिनाभरातच पूर्णतः उखडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बाजारपेठ-पहिलीवाडी ते हेत खिंडपर्यंतचे काम विभागाकडून अर्धवट करण्यात आले असून, उर्वरित रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर रस्ता ग्रामपंचायतीच्या मालकीचा असल्याने ग्रामपंचायतीने तो हस्तांतरित करून घेतल्याशिवाय कामाचे देयक संबंधित ठेकेदाराला देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. रस्त्याचे हॉटमिक्स व पेव्हर मशीनद्वारे डांबरीकरण अपेक्षित असतानाही काही ठिकाणी कोल्डमिक्सने डांबरीकरण करण्यात आल्याचा आरोप प्रमोद रावराणे यांनी केला आहे.
या सर्व कामांची दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी तसेच जोखमीच्या कालावधीत असलेली कामे संबंधित ठेकेदारांकडून नव्याने करून घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच वैभववाडी तालुक्यात या ठेकेदाराने केलेल्या सर्व कामांच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, कार्यकारी अभियंता श्रीमंगले यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून हा रस्ता पुन्हा नव्याने हॉटमिक्स पद्धतीने वैभववाडी बाजारपेठेपर्यंत करून देण्याचे मान्य केले. यावेळी जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, स्थानिक ग्रामस्थ दिलीप मोरे व कृणाल मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
