*कळसुळकरमध्ये विद्यार्थ्यांनी केला शिवविचारांचा जागर*
सावंतवाडी
कळसुळकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथे १३ ऑगस्ट २०२६ रोजी बजरंग दल व शिव संस्कृती, सावंतवाडी यांच्या सौजन्याने ‘इतिहासाची साधने व प्रदर्शन’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुर्ग रक्षक प्रतिष्ठान, दुर्ग मावळा प्रतिष्ठान तसेच नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू संवर्धन समिती यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे इतिहास विभाग प्रमुख ज्ञानेश्वर राणे व राजाराम चिपकर यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना इतिहासाच्या विविध साधनांची माहिती दिली. यावेळी बजरंग दलाचे मयुरेश पेडणेकर, कृष्णा धुळपनावर, जितेंद्र रायका, प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिव संस्कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. सुमारे साडेचारशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर सारंग सर यांनी, तर आभार प्रदर्शन ठाकूर सर यांनी केले.
कार्यक्रमात ज्ञानेश्वर राणे यांनी ‘इतिहासाची साधने’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय पाठ्यपुस्तकातील धड्याच्या अनुषंगाने इतिहासाची भौतिक व लिखित साधने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर सादर करून त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाची माहिती देण्यात आली.
ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांना मराठा धोप, दांडपट्टा, बिचवा, कट्यार, मराठा गुर्ज, खंडा, नागीण तलवार, वाघनखे, जिरेटोप व ढाल यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे प्रत्यक्ष पाहण्याची तसेच मार्गदर्शनाखाली त्यांची माहिती घेण्याची संधी मिळाली. यावेळी अफजलखान वधाच्या प्रसंगाचे वाघनखांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
लिखित इतिहासाच्या साधनांमध्ये शिवभारत, विविध शिवचरित्रे आणि मोडी लिपीतील ऐतिहासिक पत्रे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. तसेच ऐतिहासिक नाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षराचे नमुने आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ताक्षराचे नमुने यांसारख्या दुर्मीळ ऐतिहासिक साधनांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये शिवसंस्कार, इतिहासाची आवड आणि ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान निर्माण करणे, मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देणे तसेच गड-किल्ल्यांच्या संवर्धन व जतनाची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शाळा व विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आपल्या शाळेत आयोजित करू इच्छिणाऱ्या संस्था व दानशूर व्यक्तींनी ९८६०२५२८२५, ८५५०९३६४४०, ७५८८५७०५१२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
