You are currently viewing अण्णासाहेब पाटील महामंडळास 300 कोटींचा निधी प्राप्त

अण्णासाहेब पाटील महामंडळास 300 कोटींचा निधी प्राप्त

अण्णासाहेब पाटील महामंडळास 300 कोटींचा निधी प्राप्त

पात्र लाभार्थ्यांना 21 कोटींचा व्याज परतावा वितरित;

प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही सुरू

सिंधुदुर्गनगरी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 750 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या तरतुदीपैकी आतापर्यंत महामंडळास 450 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, पात्र लाभार्थ्यांना व्याज परताव्याचे वितरण सुरू आहे.

            महामंडळास यापूर्वी 20 मे 2026 रोजी 150 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून पात्र लाभार्थ्यांना व्याज परताव्याची रक्कम वितरित करण्यात आली. त्यानंतर प्रलंबित व्याज परतावा प्रकरणे निकाली काढण्यासाठी महामंडळाने 8 जुलै 2026 रोजी शासनाकडे 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

            महामंडळाच्या मागणीची दखल घेत शासनाने 3 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार मंजूर निधी 9 ऑगस्ट 2026 रोजी महामंडळाच्या अधिकृत बँक खात्यात जमा झाला आहे. यापूर्वी प्राप्त झालेले 150 कोटी आणि नव्याने प्राप्त झालेले 300 कोटी असे सन 2026-27 या आर्थिक वर्षात महामंडळास आतापर्यंत एकूण 450 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

            नव्याने प्राप्त झालेल्या 300 कोटी रुपयांच्या निधीतून 10 ऑगस्ट 2026 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 21 कोटी रुपयांची व्याज परताव्याची रक्कम थेट वितरित करण्यात आली आहे.

            उर्वरित पात्र आणि प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही प्रगतिपथावर आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या व्याज परताव्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात येणार आहे.

            महामंडळाच्या या कार्यवाहीमुळे राज्यातील पात्र लाभार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. प्रलंबित व्याज परतावा प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यासाठी महामंडळामार्फत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा