*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*” अधांतरी “*
अजब सरकार,अजब दरबार
प्यादी ही झाली, बेदरकार
“अधांतरी”हे जीवन झाले
रयत सोसते, अंधःकार. /१/
नुसते च उमाळे, आणि काळजी
अंतरी नाही “ममता”
कोण कुणाच्या,उठे जीवावर
ठासून भरलीय”विषमता”. /२/
या फांदीवर त्या फांदीवर
चंचल पक्षी बसलेले
वृक्ष झाले जीर्ण तरीही,
स्वार्थ भावने, भरलेले. /३/
डोंगरास नाही उरली,
फिकीर इथल्या वृक्षांची
जवळी केले ,कातळ काळे
फारकत केली लक्षांची. /४/
“शतरंजी” हे डाव खेळण्या
“वजीर” सुटला मोकाट
“उंटा”वरचा वाटे शहाणा
बुद्धी प्रपंच अफाट. /५/
“राजा” एक होऊन गेला
“सहृदय” तो सम्राट
होतील बहु, असतील बहु
परंतु या सम हा विरळाच/६/
काय नशिबी आज आले
“रयत “विचारी मनाला
“अधांतरी” हे जीवन झाले
समजेना या क्षणाला. /७/
रचना :— मोहन मराठे..
