You are currently viewing पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यात ‘मान्सून धमाका फेस्टीवल’ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यात ‘मान्सून धमाका फेस्टीवल’ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यात ‘मान्सून धमाका फेस्टीवल’ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी “मान्सून धमाका फेस्टीवलचे” आयोजन करण्यात येणार आहेत. या फेस्टीवलपूर्वी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन द्याव्यात, असे आदेश शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मान्सून धमाका फेस्टीवल आयोजन व जिल्ह्यातील पर्यटन आढावा बैठक शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली चिपी विमानतळ येथे झाली.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन.पाटील, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण-पाटील, प्र.जिल्हा नियोजन अधिकारी भगवान पवार, एमटीडीसी सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता विनय वावधाने, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव असून, केरळच्या धर्तीवर पर्यटन विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या स्वदेश पर्यटन अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या पावसाळ्याच्या काळात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मान्सून धमाका फेस्टीवलचे आयोजन होणार आहे. मान्सून धमाका फेस्टीवलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्याकडे आकर्षित होतील. असे सांगून श्री. केसरकर पुढे म्हणाले, एकूणच जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटनांची स्थाने निश्चित करावीत. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आंबोली, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर, वेंगुर्ला, विजयदुर्ग अशा पर्यटन समृध्द असलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटन आराखडा तयार करावा. तिलारी प्रकल्पाच्या ठिकाणी विस्तीर्ण प्रमाणात बॅक वॉटर आहे. या बॅक वॉटर परिसराची पर्यटन विभागाने पाहणी करुन या ठिकाणी केरळच्या धर्तीवर हाऊस बोट, रॉक कॉटेज, टेंट ॲडव्हेन्चर स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स, तसेच हॉटेल्स विकसित करता येतील का? याबाबत आराखडा तयार करावा. यासाठी शासन स्तरावरुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी निसर्ग निर्मित सुंदर धबधबे आहेत. अशा ठिकाणी पर्यटकांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासकीय जमिनींची उपलब्धता होईल यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, त्याचबरोबर प्राथमिक स्वरुपात जिल्ह्यातील चार ते पाच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी हेलिपॅड उभारता येईल का? याबाबत संबंधित विभागाने पाहणी करुन अहवाल तयार करावा. असे सांगून श्री. केसरकर पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या शेजारीच मोपा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाले आहे. चिपी विमानतळदेखील कार्यान्वित आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. येणाऱ्या पर्यटकाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाल्यास हा जिल्हा पर्यटनात अग्रेसर राहील. पर्यटनाबरोबरच जिल्ह्यामध्ये ॲग्रो टुरिझम, फिशींग व्हिलेज, स्कुबा डायविंग, मॅंग्रोव्हज पार्क, नेचर इंटरपिटीशन सेंटर, इको टुरिझम सुरु करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. यासाठी शासन सकारात्मक असून, आवश्यक निधी विविध माध्यमातून आणला जाईल. तसेच सिंधुरत्न योजनेमधूनही यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही ते म्हणाले.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनामध्ये अग्रेसर करण्याबरोबच अधिक विकसित होण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून मान्सून धमाका फेस्टीवलचे आयोजन पावसाळ्यामध्ये करण्यात येणार आहे. या फेस्टीवलमध्ये टेंट सिटी, वर्षा पर्यटन, वॉटर स्पोर्ट्स, ॲडव्हेन्चर स्पोर्ट्स यासाठी आवश्यक स्थळे निश्चित करण्यात येणार आहेत. हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याबाबतचा मार्केटिंग प्लॅनही तयार करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील एमटीडीसीच्या माध्यमातून सहलीचे आयोजन करणाऱ्या संस्थाचीही यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच रोड शो चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटक या जिल्ह्याकडे आकर्षित होतील. या फेस्टीवलमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायातील गुंतवणुक या जिल्ह्यात होण्यास सुरुवात होईल. हा पर्यटन महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडाव्यात, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासन काम करत असून, जिल्ह्यामधील दोडामार्ग, आंबोली, तिलारी, तारकर्ली या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर सिंधुरत्न योजनेतून निधी देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मान्सून धमाका फेस्टीवलसाठी आवश्यक असणारे सर्व प्रस्ताव शासनाच्या मार्गदर्शनानुसार तातडीने तयार करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनांच्या ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध होऊन आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम संबंधित विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

सिकॉनचे एमडी सेन गुप्ता यांनी पर्यटन वाढीबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. विविध विभागांनी पर्यटन वाढीसाठी नवनवीन संकल्पना यावेळी सविस्तरपणे मांडल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा