*श्री तुकाराम मुंढे अमरावतीला ते आले; ते बोलले आणि त्यांनी अक्षरशः जिंकले*
21 वर्षांपूर्वी श्री तुकाराम मुंढे जेव्हा आयएएस झाले तेव्हा मी त्यांना अमरावतीला व्याख्यानाला बोलाविले होते. तो कार्यक्रम अमरावतीच्या भव्य अशा श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित केला होता.
यावेळेस श्री तुकाराम मुंढे यांना बोलवायचे तर त्याचे सगळे नियोजन नीट करणे गरजेचे होते. कारण या 21 वर्षात तुकाराम मुंढे सर्वत्र चर्चेत होते. वीस वर्षात 25 बदल्या झाल्यामुळे ते संपूर्ण भारतात चर्चेचा विषय झाले होते. त्यांच्या कामामुळे सगळे लोक भारावून गेले होते. या कार्यक्रमाला भरपूर लोक येतील त्या दृष्टिकोनातून श्री रोहन भामकर श्री प्रदीप चेचरे कस्तुरबा महिला खादी समिती कुटीर डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी श्री शिवाजी कृषी महाविद्यालय मराठी पत्रकार संघ ग्राहक परिषद लेखक वक्ते उद्योजक सर्व एकत्र आले.
एमआयडीसी ए 25 या ठिकाणी कस्तुरबा महिला सोलर खादी समितीचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी आयोजनाबाबत मिटिंग व्हायला लागल्या. श्री रोहन भामकर हे वर्ध्यावरून या मिटींगला यायचे. स्थानिक जबाबदारी श्री प्रदीप चेचरे यांनी सांभाळली होती. पावसाची शक्यता लक्षात घेऊन पोटे टाऊनशिप मधील दहा हजार लोक मावतील एवढा मोठा स्वामी विवेकानंद हाल बुक करण्यात आला.
कार्यक्रमाला भरपूर लोक यावेत व लोकांच्या पर्यंत हा कार्यक्रम जावा यासाठी दहा हजार पत्रिका छापण्यात आल्या. 1000 व्हीआयपी पत्रिका छापण्यात आल्या.ऑनलाइन पत्रिका देखील 15000 बुक झाल्या. सोशल मीडियावर तर तुकाराम मुंढे सरांच्या पत्रिकेला लाखोंनी प्रतिसाद मिळाला. राजेश डागा सारखे अनेक मित्र समोर आले .त्यांनी जागोजागी होर्डिंग लावले. पंचवीस हजार हँडबिल हया वर्तमानपत्राच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्यात आल्या.
सर्व कार्यकर्ते आपले पद विसरून आपली संस्था विसरून कामाला लागले होते. सुप्रसिद्ध निवेदिका शिप्रा मानकर पल्लवी यादगिरे तेजस्विनी पाटील अशोक हांडे शिवा प्रधान नाना रमातकार आणि शिवाजी कृषी महा विद्यालयाचे प्राध्यापक व स्वयंसेवक स्वतःच्या पैशाने स्वतःच्या गाडीने प्रत्येक जण फिरत होता. मी व आमच्या मिशन आईच्या टीमने अमरावती परिसरातील 50 किलोमीटर परिसरातील शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन पत्रिकांचे वितरण केले व तिथे स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन तुकाराम मुंढे यांच्या कार्यक्रमाला येण्याची त्यांना विनंती ही केली
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी प्रचंड गर्दी झाली. तुकाराम मुंढे सरांचे पूर्ण भारतात महाराष्ट्रात खूप कार्यक्रम झाले असतील पण इतका मोठा कार्यक्रम यापूर्वी झाला नाही आणि कदाचित भविष्यातील होणारही नाही. अमरावतीच्या या कार्यक्रमाने सर्व रेकॉर्ड तोडले. तुकारामांचा कार्यक्रम होणार म्हणून पाऊसही थांबला. कठोरा नाका ते पोटे टाऊनशिप लोकांचा कारवा लागलेला होता. ज्यांच्याजवळ वाहन नव्हते. ते लोक विद्यार्थी पायी कार्यक्रम स्थळी आले आणि पायीच गेले.
कार्यक्रम पाच वाजताचा होता. पण आम्ही संयोजक एक वाजता पासूनच स्वामी विवेकानंद सभागृहात तयारीला लागलो होतो. प्रत्येक गोष्ट तपासून पाहिल्या जात होती. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे ७१ विद्यार्थी देखील स्वयं सेवक म्हणून आले होते. शिवाय रोहन भामकर सरांनी दहा बाऊन्सर सांगितले होते. तुकाराम मुंढे कसे येणार कुठे बसणार स्टेजवर कोण कोण असणार कोण सत्कार करणार हे सगळं आधीच सभेमध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही उजळणी करीत होतो.
तुकाराम सर विद्यार्थ्यांच्या प्रचंड गराड्यात सभास्थळी आले. त्यांना सभास्थळी विद्यार्थ्यांमधूनच आणण्यात आलं. शेकडो मोबाईल फोटो काढण्यासाठी समोर आले. आम्ही संयोजकांनी कोणाचेच भाषण ठेवले नव्हते .फक्त तुकाराम सर आणि तुकाराम सरच. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांनी तुकाराम सरांचा खालीच सत्कार केला.
तुकाराम मुंढे स्टेजवर आले. आणि माईकचा ताबा घेतला.
त्यांच्या बोलण्यामध्ये आवेश होता. त्यांच्या बोलण्यामध्ये अनुभवाची झालर होती. स्वतः जे कष्ट केले त्या कष्टातून त्यांनी जे आयुष्य उभे केले त्याची समर्थ ताकद त्यांच्या बोलण्यामध्ये होती. त्यामुळे ते बोलत होते .लोक ऐकत होते आणि हजारो लोक असल्यानंतरही सभागृहामध्ये कमालीची शांतता होती. त्यांच्या वाक्या वाक्यावर टाळ्यांचा गजर होत होता.
विद्यार्थ्यांनी असा अधिकारी पाहिला नव्हता. आणि भविष्यात पाहतील याची शाश्वती नव्हती म्हणून जो मिळेल त्या वाहनाने ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी स्थानापन्न झाला होता .
सभागृहबाहेर स्क्रीन लावण्यात आले होते. श्री तुकाराम मुंढे येण्याच्या आधी सभागृह पूर्ण भरले होते ज्यांना जागा मिळाली नाही ते बाहेर स्क्रीनवर कार्यक्रम पाहत होते. जी मुले पुस्तके विकत घेतील त्यांच्या पुस्तकांवर तुकाराम सर सही करणार असे ठरले होते. पुस्तकाची विकत घेणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. मोठ्या संख्येने पुस्तके विकल्या जात होती. तुकाराम सर येण्यापूर्वी पुस्तकाचे लेखक श्री शफी पठाण यांनी पुस्तकाबद्दल माहिती सांगितली. तुकाराम सरांवर सभागृहाबाहेर व सभागृहाच्या आत अतिशय देखणी अशी रांगोळी काढण्यात आली होती.
तुकाराम सर येण्यापूर्वी कस्तुरबा खादी सोलर महिला समितीने अतिशय चांगला खादीचे वस्त्र वापरून फॅशन शो सादर केला त्याला देखील लोकांनी चांगली दाद दिली. तुकाराम सर बोलत होते. लोक ऐकत होते. ते बेंबीच्या देठापासून बोलत होते. त्यामुळे ते युवकांच्या हृदयात जात होते.
कार्यक्रम संपला. लोकांचे थवेच्या थवे पोटे टाऊनशिप वरून कठोरा नाक्याकडे पायी वाटचाल करीत होते. तुकाराम सरांनी पोरांना नागरिकांना जागे केले होते. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली होती.
रात्री तुकाराम सरांचा निरोप घेऊन आम्ही विश्रामभावनातून जिजाऊ नगरात आलो तेव्हा मध्यरात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे मिशन आयएएसयाची मुले कार्यक्रमाला आली होती त्यांना सकाळी विश्राम भवनात मी बोलावून घेतले. तुकाराम सर तयार झाल्याबरोबर त्यांचा एक ग्रुप फोटो काढला. नंतर विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगर मध्ये श्री तुकाराम मुंढे आले. त्यांचे जिवलग मित्र प्रा मनीष गायकवाड हे आमच्या जिजाऊ नगर मध्येच राहतात. तुकाराम मुंढे यांनी ज्या टेबलवर बसून अभ्यास केला तो टेबल त्यांनी पाहिला. गायकवाड व लुंगे परिवार यांच्याबरोबर फोटो काढले. पुढचा कार्यक्रम नागपूरला होता. आणि त्यांच्या गाड्या नागपूरकडे निघाल्या.
नेपोलियन बाबत आपण असं म्हणतो तो आला त्याने पाहिले आणि त्याने जिंकले. तसेच अमरावतीच्या दौ-याबाबत तुकाराम सरांबद्दल असेच म्हणावे लागेल. ते आले .ते बोलले आणि त्यांनी अक्षरश: जिंकले .
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
जिजाऊ नगर
अमरावती कॅम्प
9890967003
.
