You are currently viewing करवंदाचा साखरांबा

करवंदाचा साखरांबा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित पाककृती*

 

*करवंदाचा साखरांबा*

 

आषाढ सुरू झाला की संपेपर्यंत बाजारात,कोणाच्या शेतात खूप करवंद येतात‌.हिरवी जांभळी व पिवळी जांभळी अशी ही बोराएवढी करवंद रंगामुळे दिसतातही खूप सुरेख….खूप आंबट नसलेली पण पुरेशी आंबट चवीची ही करवंद चटणी,ठेचा,साखरांबा,मेथांबा अशा स्वरूपात खायला खूप छान लागतात.भोजनाचा स्वाद वाढतो…ऋतूप्रमाणे येणारी फळे व रानफळे ,भाज्या खाणं आरोग्याला हितकारकच असतं.

करवंदाचा साखरांबा हा गोड प्रकार सगळ्यांना आवडतोच…

कृती….टपोरी करवंद निवडून पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करावीत.उभ्यातून करवंद चिरून बिया काढून टाकाव्या.

स्टीलच्या चाळणीत करवंदाला अगदी थोडीशी वाफ काढावी.कारण ती लवकर शिजतात.फोडीच्या दुप्पट साखरेत,साखर बुडेल एवढे पाणी घालून पक्का पाक झाला की किंचित वाफ काढलेलया फोडी घालून ढवळावे.करवंदातील पाण्यामुळे पाक आधी पातळ होतो व मग थोडा घट्ट होतो.

यात आवडत असल्यास वेलची पूड घालावी.छान जांभळट रंगाचा साखरांबा खायला तयार…!वयस्कर लोकांना,शाळेतील मुलांना,घाईच्या वेळी,अचानक पाहुणे आलेतर करवंदाचा साखरांबा लगेच पोळीसोबत देता येतो.श्रावणातील एका तरी सोमवारी जेवणात असतोच.

फ्रीजमधे ठेवल्यास दोनतीन महिनेही छान टिकतो.

बघाच मग करून…!

तसेच करवंदाचा मेथांबाही तोंडाला चव आणतो,जेवणाची लज्जत वाढवतो.

करवंदाचा मेथांबा…

करवंद धुवून पुसून उभी चिरायची.थोड्याशा तेलात जीरंमोहरी फोडणी घालून आवडल्यास लसूण फोडणीत घालून फोडी तेलात परतायच्या,

थोडे मऊ झाल्या फोडी की त्यात किंचित मेथीपूडहळद,तिखट,मीठ प्रमाणात घालून फोडीइतका गूळ घालून सर्व एकत्र शिजवावे.थोडे पाणी लागले तर घालावे.आंबट,तिखट गोड चवीचा हा मेथांबा करून खाऊन बघा..व नक्की कळवा हं!👍✍️

 

अरुणा दुद्दलवार

प्रतिक्रिया व्यक्त करा