रामदेव बाबा फाउंडेशनतर्फे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जांभूळ कलमांचे वितरण
विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांनी वृक्षलागवड व संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले
फोंडाघाट, प्रतिनिधी :
न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेत मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी रामदेव बाबा फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीची जांभूळ झाडांची कलमे भेट देण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेचे प्राचार्य प्रसाद पारकर तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य प्रभारी डॉ. तुळशीराम रावराणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याची नियमित जपणूक करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात गुरुवर्य श्री. कोचरेकर सर तसेच सहकारी दिलीप रावराणे यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. तसेच सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण झाली असून, पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
