फोंडाघाटातील गणेशमूर्ती शाळांमध्ये लगबग; पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना मोठी मागणी
अजित नाडकर्णी यांनी दिली मूर्ती शाळांना भेट; सुहास परब यांच्या कलाकृतींचे कौतुक, नागपंचमीपूर्वी भाविकांकडून मूर्ती निवडीला वेग
फोंडाघाट
गणेशोत्सव जवळ येत असल्याने फोंडाघाट परिसरातील श्री गणेशमूर्ती शाळांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून मूर्ती घडविण्याच्या कामाला वेग आला आहे. संवाद मीडियाचे प्रतिनिधी अजित नाडकर्णी यांनी विविध मूर्ती शाळांना भेट देत तेथील कामाची पाहणी केली व मूर्तिकारांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे कौतुक केले.
प्रतिक आर्ट्सचे मूर्तिकार सुहास परब यांच्या मूर्ती शाळेत सध्या विविध आकारांच्या पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. यावेळी बोलताना सुहास परब म्हणाले, “पावसामुळे काही अडचणी येतात; मात्र श्री गणपती बाप्पाच्या कृपेने त्यातूनही मार्ग निघतो. या महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व मूर्तींचे काम पूर्ण करून दागिने, डोळे व अंतिम रंगरंगोटीही पूर्ण केली जाईल.”
याशिवाय मांजळकरवाडी तसेच लोरे नं. २ परिसरातील मूर्ती शाळांमध्येही दिवस-रात्र काम सुरू असून कारागीर गणेशोत्सवासाठी आकर्षक मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत.
कोकणातील सर्वात मोठा आणि लोकांचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी नागपंचमीच्या सुमारास अनेक भाविक आपल्या गणेशमूर्तीची निवड करतात. फोंडाघाटातील मूर्ती शाळांमध्ये पूर्णपणे शाडू मातीपासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या जात असून येथून पाच फूट उंचीच्या मूर्तीही घाटमाथ्यावरील विविध भागांत पाठविल्या जातात.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत फोंडाघाटातील मूर्तिकार आपल्या कलाकृतींमधून परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम जपत आहेत.
— अजित नाडकर्णी, संवाद मीडिया
