You are currently viewing बोलून काय फायदा

बोलून काय फायदा

*साहित्यिक ऋषिकेश कामत लिखित अप्रतिम लेख*

 

*बोलून काय फायदा?*

 

“बोलून काय फायदा…”

आजच्या काळात हे फक्त वाक्य राहिलेलं नाही. ही आपल्या समाजाची मानसिकता बनली आहे.

आपण इतके प्रॅक्टिकल झालो आहोत की प्रत्येक गोष्टीचा हिशोब “फायदा” आणि “तोटा” या दोनच तराजूंवर मोजू लागलो आहोत.

पैसे कुठल्या बँकेत ठेवायचे? जास्त व्याज कुठे मिळेल? कोणता व्यवसाय करायचा? कोणत्या नोकरीत जास्त पगार आहे? कोणती वस्तू स्वस्त पडेल? कोणत्या नात्यात आपला उपयोग आहे?

प्रत्येक निर्णयामागे एकच प्रश्न असतो…

यात माझा फायदा काय?

इथपर्यंत ठीक आहे. व्यवहारात शहाणपण असायलाच हवं.

पण दुर्दैवाने, हा हिशोब आता पैशांपुरता राहिलेला नाही. तो आपल्या विचारांमध्ये, आपल्या स्वभावात आणि आपल्या आवाजातही शिरला आहे.

आज आपण बोलण्याआधीही विचार करतो…

*”यात माझा फायदा काय?”*

म्हणूनच आज सर्वात जास्त ऐकू येणारं वाक्य म्हणजे…

बोलून काय फायदा…

समोर अन्याय होत असतो…

एखाद्यावर अत्याचार होत असतो…

भ्रष्टाचार उघडपणे सुरू असतो…

एखाद्याचे हक्क हिरावले जात असतात…

समाजाची फसवणूक होत असते…

आणि आपण शांत बसतो.

कारण…

*बोलून काय फायदा…*

लक्षात घ्या, ही शांतता विवेकाची नाही…

ही भीतीची आहे.

ही स्वार्थाची आहे.

ही सोयीची आहे.

इतिहास बदलणारे लोक कधीच फायद्याचा हिशोब करत नव्हते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना फायद्याचा विचार केला असता, तर स्वराज्य उभंच राहिलं नसतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी संघर्ष करताना स्वतःच्या सुखाचा विचार केला असता, तर लाखो लोक आजही अंधारातच राहिले असते.

जगातले प्रत्येक मोठे बदल काही मोजक्या लोकांच्या आवाजामुळे घडले.

त्या आवाजामागे नफा नव्हता…

जबाबदारी होती.

पण आज समाजात एखादा माणूस धाडस करून उभा राहतो.

तो प्रश्न विचारतो.

व्यवस्थेला जाब विचारतो.

लोकांच्या हक्कासाठी लढतो.

त्याच्यावर टीका होते.

त्याला धमक्या मिळतात.

त्याची बदनामी होते.

त्याचा वेळ, पैसा, मानसिक शांतता—सगळं खर्च होतं.

आणि ज्यांच्यासाठी तो लढतो…

तेच लोक दूर उभे राहून म्हणतात,

तुम्ही बरोबर करताय…

पण तो विचारतो,

“मग माझ्यासोबत उभे का राहत नाही?

उत्तर तयार असतं…

*बोलून काय फायदा…*

यापेक्षा मोठा विरोधाभास कोणता?

आपल्याला बदल हवा असतो…

पण बदल घडवणाऱ्याच्या बाजूला उभं राहायचं नसतं.

आपल्याला स्वच्छ व्यवस्था हवी असते…

पण भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवायचा नसतो.

आपल्याला न्याय हवा असतो…

पण न्यायासाठी लढणाऱ्याला साथ द्यायची नसते.

आपल्याला नायक हवेत…

पण नायक एकटे पडले की आपण प्रेक्षक बनून बसतो.

आणि मग एक दिवस…

तो लढणारा माणूसही शांत होतो.

त्याचा आवाज हरवतो.

त्याच्या डोळ्यातली जिद्द मरते.

कारण त्यालाही जाणवतं…

ज्यांच्यासाठी लढतोय, त्यांनाच काही फरक पडत नाही.

आणि त्या दिवशी समाज फक्त एक माणूस हरवत नाही…

तर स्वतःचा विवेक हरवतो.

आज समाजाला गप्प लोकांची गरज नाही.

आज गरज आहे अशा लोकांची, जे फायदा-तोट्याचा हिशोब न करता सत्याच्या बाजूने उभे राहतील.

कारण प्रत्येक वेळी आवाज उठवल्याने लगेच बदल होईलच असं नाही.

पण प्रत्येक वेळी गप्प राहिल्याने…

बदल कधीच होणार नाही.

म्हणून पुढच्या वेळी “बोलून काय फायदा?” हा प्रश्न मनात आला…

तेव्हा स्वतःलाच एक प्रश्न विचारा…

आज मी गप्प राहिलो, तर उद्या बोलण्याचा अधिकार तरी उरेल का?

कारण…

समाजाचा ऱ्हास तेव्हा सुरू होत नाही, जेव्हा वाईट लोक चुकीचं करायला लागतात…

समाजाचा ऱ्हास तेव्हा सुरू होतो, जेव्हा चांगली माणसं म्हणायला लागतात—

 

*बोलून काय फायदा* …

 

✍️ ऋषिकेश कामत, रत्नागिरी

प्रतिक्रिया व्यक्त करा