जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मैत्रीचं झाड*
मैत्रीचं झाड
असं कुठेही उगवत नसतं,
हळव्या मनाच्या कुपीत
काळजाच्या हिरवळीवर फुलत असतं.
आपुलकीचं खत मिळालं की,
मायेचं पाणी त्यात झिरपतं;
आपलेपणाच्या प्रत्येक फांदीवर
प्रेमाचं सुंदर फूल फुलतं.
जिव्हाळ्याचे हात हातात येतात,
आनंदाची गाणी गातात;
दुःखाची सावली आली की,
मित्रच खंबीरपणे उभे राहतात.
वादळं कितीही आली तरी
विश्वासाची मुळं ढळत नाहीत;
निःस्वार्थ मैत्रीच्या वाटेवर
स्वार्थ कधीच आडवा येत नाही.
ना जातीचा, ना धर्माचा,
ना श्रीमंतीचा रंग त्याला असतो;
अडचणीच्या गुंतागुंतीत फक्त
पाठीवर मित्राचाच हात दिसतो.
“मी आहे ना!”
एवढंच मात्र पुरेसं असतं;
डोळ्यासमोर मित्र असला की,
कुठलंच संकट मोठं वाटत नसतं.
आयुष्याच्या संध्याकाळी,
जेव्हा आपले सारे दूर निघून जातात,
तेव्हा मैत्रीच्या झाडाखाली
फक्त मित्रच सोबत असतात.
मान, सन्मान, पैसा, वैभव
काहीच कामाचं नसतं;
मनापासून जपलेलं मैत्रीचं नातं
विचारांच्या पलीकडचं असतं.
थाटमाट, गरीब-श्रीमंत,
भेदभाव मैत्रीत कधीच नसतो;
पडलो, झडलो, लागलं कुठे तर
अश्रू पुसायला फक्त मित्राचाच हात पुढे असतो.
विकत घेतलं तर
सुख-समृद्धी पायाखाली लोळण घेईल;
पण वणवा पेटला तर सोबतीला
फक्त आणि फक्त मित्रच धावून येईल.
म्हणून सांभाळून ठेवा हे मैत्रीचं झाड,
कधी त्याच्या फांद्या तोडू नका;
अहंकाराच्या कुऱ्हाडीने
त्याच्या मुळांवर घाव घालू नका.
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८
