You are currently viewing तुकाराम मुंढेमुळे अमरावतीची पल्लवी झाली सनदी अधिकारी 
Oplus_16908288

तुकाराम मुंढेमुळे अमरावतीची पल्लवी झाली सनदी अधिकारी 

 

2005 या वर्षी श्री तुकाराम मुंढे आयएएस झाल्यानंतर त्यांचा अमरावतीला भव्य सत्कार करण्यात आला होता. हा सत्कार अमरावतीच्या मोर्शी रोडवरील सुप्रसिद्ध अशा श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाला होता .

या सभागृहात पल्लवी देविदास चिंचखेडे नावाची तेव्हा सातव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी उपस्थित होती. तिचे वडील श्री देविदास चिंचखेडे तिला घेऊन या कार्यक्रमाला आले होते. तिने भाषण ऐकले. श्री तुकाराम मुंढे हृदयापासून बोलत होते. हे नुकतेच आय ए एस झाले होते. त्यांचा तडफदारपणा तारुण्याचा उन्मेष त्यांच्या व्याख्यानातून व्यक्त होत होता. त्यांनी आपण किती गरिबीतून कलेक्टर झालो आहोत हे प्रभावीपणे मांडले.

त्या काळात स्पर्धा परीक्षा विषयक जनजागृती नव्हती. पण श्री तुकाराम मुंढे यांचे उस्फुर्त भाषण ऐकले आणि पल्लवी चिंचखेडे पेटून उठली.

आणि आज केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ती दिल्लीमध्ये केंद्र शासनामध्ये उच्च पदावर कार्यरत आहे.

पल्लवीचे वडील श्री देविदास चिंचखेडे हे अमरावतीच्या चपराशीपुरा भागातील बिच्छू टेकडी या भागात राहतात. नाल्याच्या काठावर त्यांचे घर आहे. घरापर्यंत जायला नीट रस्ता नव्हता आणि आजही नाही आहे. देविदास चिंचखेडे हा दृष्टी असलेल्या माणूस. ते स्वतः घराला रंग देण्याचे काम करतात. सौ वहिनी शिवणकाम करतात.. मोठमोठ्या साहेब लोकांकडे श्री देविदास चिंचखेडे हे रंगकाम करण्यासाठी जायचे.

साहेब लोकांचे बंगले त्यांचे राहणीमान त्यांचा थाट पाहून त्यांना असे वाटले की माझी मुलगी पण अधिकारी झाली तर.

पण नुसता हा विचार मनात आणून ते थांबले नाहीत. तर त्यांनी पल्लवीवर तसे कृतीशील प्रयोग सुरू केले. तिला वेगवेगळ्या कार्यक्रमाला घेऊन जाणे. तिला भाषण देण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी चे प्रवृत्त करू लागले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जे ज्ञान लागते त्या ज्ञानाची दररोज ते तयारी करू लागले. वर्तमानपत्र आले की त्यातील महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडणाऱ्या बातम्या ते कापून पल्लवीला दाखवू लागले. पल्लवीला त्यांनी वर्तमानपत्र वाचण्याची सवय लागली.

एवढ्यातच अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत श्री तुकाराम मुंढे यांचा सत्कार व त्यांचे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अमरावतीला श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित केले होते. सभागृह गच्च भरले होते. श्री तुकाराम मुंढे यांचा एक एक शब्द मुलांना पेटवत होता. जागे करीत होता आणि आता स्पर्धा परीक्षेकडे वळा आणि अधिकारी व्हा असा मंत्र देत होता. तो मंत्र अनेक लोकांना लागू झाला. या कार्यक्रमातून अनेक अधिकारी घडले असतील. त्यातीलच एक आहे पल्लवी चिंचखेडे.

पल्लवी चिंचखेडेचे वडील नुसतं भाषण ऐकून थांबले नाहीत .लगेच त्यांनी कृतिशील कार्यक्रम राबविला. कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते माझ्या विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरात आले. तोपर्यंत श्री तुकाराम मुंढे निलेश भरणे हर्षद वेंगुर्लेकर शशांक देशपांडे हे आयएएस झालेले विद्यार्थी सत्काराचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपापल्या गावाला रवाना झाले होते. त्यांनी मला पल्लवीला मार्गदर्शन करण्यास सांगितले. झालेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले आणि मला म्हणाले सर आता पल्लवीला योग्य दिशा द्या. मी त्यांना म्हटले .आम्ही फक्त मार्गदर्शन देऊ .प्रत्यक्ष कृती तुम्हाला आणि पल्लवीलाच करायची आहे.

पल्लवीला माझ्या संग्रहातील काही मुले पुस्तके मी दिली. तसेच वर्तमानपत्र वाचण्यावर व सहावी ते बारावीचा अभ्यास काळजीपूर्वक करण्यासाठी तिला आवर्जून सांगितले. पल्लवी पेटून उठली ती तुकाराम मुंढे यांच्या भाषणामुळे. खरे तर असे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजे. ते काम अमरावती मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी गेल्या 26 वर्षांपासून विनामूल्य करीत आहे आणि करीत राहणार आहे. पण यासाठी देविदास चिंचखेडे सारखे दृष्टी असलेले पालक देखील असणे गरजेचे आहे. देविदास चिंचखेडे हे मुलीच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष देऊन होते. तिला वर्तमानपत्र वाचण्यास प्रवृत्त करणे. त्यातील महत्त्वाच्या बातम्या कापून तिच्यासमोर ठेवणे .हे काम ते करीत होते. खरं म्हणजे त्यांचा व्यवसाय कष्टाचा होता. घराला रंग देणे म्हणजे कष्टाचेच काम होते. शिवाय रंग देताना अंगावर रंग उडतो. कपड्यावर रंग उडतो. पण ते हरले नाहीत .ते पल्लवीला प्रोत्साहितच करीत राहिले.

पल्लवी फार मोठ्या शाळांमध्ये शिकली नाही .सर्व सामान्य शाळेमध्ये तिचं शिक्षण झाले. आज आता इतके वर्ष झाले आहेत. तरीही बिच्छू टेकडीचा जसा पाहिजे तसा विकास झालेला नाही. आजही पल्लवीच्या घराला जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. मुरमाड रस्त्यावरूनच जावे लागते. शिवाय खड्डे लागतात ते वेगळेच.

पल्लवीच्या घरासमोरूनच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जातो. या रस्त्यावरून प्रत्येक दोन मिनिटाला वाहनांची येज्जा सुरू असते. त्यांचे कर्कश आवाज पूर्ण परिसरात मध्ये घुमत असतात. अशाही परिस्थितीमध्ये पल्लवीने आपला शालेय अभ्यास काळजीपूर्वक केला.

पुढे तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि तिला साथ मिळाली ती बार्टीची. महाराष्ट्र शासनाने बार्टीची निर्मिती करून समाजातील उपेक्षित घटकांसाठी स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करून घेण्यासाठी विविध योजना आखलेल्या आहेत. पल्लवीने त्याचा लाभ घेतला आणि एक दिवस वर्तमानपत्र मध्ये बातमी आली ती म्हणजे अमरावतीची पल्लवी चिंचखेडे यूपीएससीची परीक्षा पास झाली.

श्री तुकाराम मुंढे यांचे भाषण आणि श्री देविदास चिंचखेडे यांचे सातत्यांचे मार्गदर्शन व पाठपुरावा यामुळे पल्लवीने हे यश संपादित केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण होऊन ती आता दिल्लीला रुजू झालेली आहे.

पल्लवीचे वडील श्री देविदास चिंचखेडे हे नियमितपणे आमच्याकडे येतात. आमच्या स्पर्धा परीक्षा शिबिराला येतात. आणि न चुकता शिबिरातील सर्व मुलांसाठी खाऊ घेऊन येतात. परवा मी त्यांच्या घरी श्री तुकाराम मुंढे यांचे निमंत्रण द्यायला गेलो. निमंत्रण स्वीकारले.ते आत मध्ये गेले आणि एक पाकीट माझ्या हाती दिले. ते म्हणाले सर फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही माझी वर्गणी घ्या. आम्ही दहा हजार पत्रिका वाटल्या. स्वतःहून माझी वर्गणी घ्या असा म्हणणारा श्री राजेश डागा यांच्यानंतरचा हा पहिलाच माणूस. त्यांच्या या उदार वृत्तीमुळेच पल्लवी घडली असे म्हणावे लागेल.

ते मला सांगत होते की सर मी स्वतःहून इतर मुलांना मदत करतो. कुणाला ड्रेस घेऊन देतो तर कुणाला पुस्तके .जिथे जिथे सार्वजनिक चांगले कार्यक्रम आहेत त्याला स्वतःहून मदत करतो

अमरावतीच्या चपराशीपुरा विभागात बिच्छू टेकडी सारख्या मागास वस्तीत राहून नाल्याच्या काठावर घर असून आणि समोर हायवे असून अशा विपरीत परिस्थितीमध्ये पल्लवीने केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण करून अमरावतीच्या गौरवात भर टाकली आहे.

पल्लवी चिंचखेडे ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली. ही बातमी पसरतात पल्लवीचे अभिनंदन करायला माजी लेडी गव्हर्नर व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई अमरावतीचे तत्कालीन पालकमंत्री आताचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे व इतरांनी गर्दी केली.

पल्लवीचे घर लहान. खोल्या देखील लहान. शिवाय नाल्याच्या काठावरील घर. घराला कुंपण नाही. घराच्या आजूबाजूला अंगण. तेही ओबडधोबड.लोकांची इतकी गर्दी वाढली की देविदास चिंचखेडे यांना आपली मुलगी खऱ्या अर्थाने जीवनामध्ये यशस्वी झाली याचा भास झाला आणि तो खरा होता.

मी जेव्हा पल्लवीला भेटायला गेलो किंवा तिची अर्धी खोली पुष्प गुच्छ आणि भेटवस्तूंनी भरली होती. येणाऱ्या जाणाऱ्यांची ओढ सुरूच होती.

पल्लवीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे.तिला अजून आयएएस भेटायचं आहे. त्यासाठी ती जोमाने अभ्यासाला लागलेली आहे. ऑगस्टमध्ये तिची मुख्य परीक्षा आहे. ती आता आय आर एस म्हणून रुजू झालेली आहे .पण तिला व्हायचे आहे कलेक्टर आणि म्हणून ती एक तारखेला सायंकाळी पाच वाजता पोटे टाऊनशिपमध्ये होणाऱ्या श्री तुकाराम मुंढे यांच्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही. पण 21 वर्षांपूर्वी श्री तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान ऐकून पल्लवी सारखे अनेक विद्यार्थी घडले. पल्लवी हे त्याचे प्रतीक आहे.

आणि आता तर काळ बदलला आहे. एक उत्कृष्ट आय ए एस अधिकारी म्हणून तुकाराम सरांचा सर्वत्र बोलबाला आहे. ह्या कर्तव्यदक्ष कर्तव्य तत्पर न्यायप्रिय आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या श्री तुकाराम मुंढे यांच्या एक ऑगस्टला होणाऱ्या व्याख्यानातून अनेकांना प्रेरणा मिळेल. अनेकांना स्फूर्ती मिळेल आणि त्यातून उद्याच्या पल्लवी निर्माण होतील यात शंका नाही.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा