You are currently viewing बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक कै.भाऊ सामंत !

बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक कै.भाऊ सामंत !

कुडाळ:

 

कोकणातील लोक कसे निष्ठावंत असतात,निष्ठेपुढे पदांची अपेक्षा ठेवत नाही याचे उत्तम उदाहरण काल माझ्या मतदारसंघातील कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावामधील कै.भाऊ सामंत यांच्या निवासस्थानी सामंत कुटुंबियांची योगायोगाने भेट झाली असता दिसून आले. कै.सामंत यांच्याबद्दल यापूर्वी मी ऐकले होते.परंतु या भेटीवेळी कुटुंबियांनी भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.याप्रसंगी चर्चेवेळी बाळासाहेबांनी ५ फेब्रुवारी १९६८ साली सामंत यांना दिलेले पत्र वाचण्यास मिळाले. या पत्रात सामंत यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांनी उल्लेख केला आहे. यावरून त्यांची शिवसेनेवर असलेली निष्ठा आणि बाळासाहेबांचा त्यांच्यावर किती विश्वास होता हे दिसून आले.

आंदुर्ले येथील कै.भाऊ सामंत हे ठाणे येथे राहत होते. ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ते ओळखले जायचे. ठाणे नगरपालिकेची निवडणूक जिंकण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे.

कै.भाऊ सामंत यांनी ठाणे नगरपालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. बाळासाहेब त्यांच्याच घरी बसून निवडणुकीची रणनीती आखत होते. १९६८ च्या काळात ठाणे नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यामध्ये सामंत यांचा मोठा वाटा होता.सामंत यांची शिवसेनेवर असलेली निष्ठा पाहून बाळासाहेबांनी त्यांना अनेक पदे भूषविण्याची संधी दिली व विनंतीही केली होती.परंतु शेवटपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच काम करण्यावर ते ठाम राहिले.त्यावेळी ते पदांच्या मागे गेले असते तर महापौर, खासदार,मंत्री झाले असते. बाळासाहेबांचे एवढे प्रेम त्यांच्यावर होते. त्यांनीही बाळासाहेबांसाठी निष्ठापूर्वक काम केले होते. कोकणातील लोक किती निष्ठावंत असतात प्रसंगी कुठल्या पदाची देखील ते अपेक्षा धरत नाहीत हे सामंत यांनी दाखवून दिले. सामंतांसारखे अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक ठाण्यामध्ये बाळासाहेबांच्या पाठीशी ठाम राहिले होते.आज ते प्रवाहात नसले तरी ठाणे नगरपालिका जिंकण्यासाठी त्यांनीही मोलाचे योगदान दिले होते.

खडतर परिस्थितीत अनेक संकटांना सामोरे जात कै.सामंत यांनी ठाण्यात शिवसेनेची संघटना वाढविण्याचे काम केले होते. आताचे ठाण्याचे नेते संबोधले जाणारे तेव्हा कोणी नव्हते. आताच्या राजकारण्यांप्रमाणे पदांच्या लालसेपोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही सामंत यांनी शिवसेनेशी गद्दारी केली नाही. नंतरच्या काळात आंदुर्ले येथे गावाकडच्या घरी शेतीवाडी सांभाळण्यासाठी त्यांना गावी यावे लागले.परंतु कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी असलेली निष्ठा त्यांनी सोडली नाही. त्यांचे कुटुंबीय उच्चशिक्षित असून देखील ते राजकारणापासून लांब आहेत. शिवसेनेकडून त्यांना जे प्रेम मिळालं त्यात त्यांनी समाधान व्यक्त केले.

*ठाण्यामध्ये शिवसेनेची संघटना वाढविण्यामध्ये अशा असंख्य भाऊ सामंतांचा हात आहे. परंतु त्यांचे कुटूंबिय या गोष्टींचा उहापोह कुठे करत नाहीत मात्र अशा निष्ठावंतांची दखल जनता घेत असते त्या सर्व निष्ठावंतांना सलाम..!*

 

— *श्री. वैभव नाईक*

प्रतिक्रिया व्यक्त करा