अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा….

अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा….

– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषि विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजापेक्षा हे नुकसान जास्त आहे. शेतीचे नुकसान नेमके किती झाले आहे हे समजण्यासाठी नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिले आहेत. कृषि विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नुतन बैठक हॉलमध्ये आज संपन्न झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी हे आदेश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्यासह माजी आमदार व सदस्य श्री. गोगटे,  निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्राशंत पानवेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. म्हेत्रे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांच्यासह विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
सध्या शेतीच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत, ते तातडीने पूर्ण करावेत  असे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, कृषि क्षेत्राचे झालेले नेमके नुकसान लवकरात लवकर समजण्यासाठी हे पंचनामे पूर्ण होणे महत्वाचे आहे. तालुका कृषि अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून हे पंचनामे पूर्ण करावेत. पंचनामे पूर्ण करण्यात काही अडचणी असल्यास त्या कृषि अधिक्षक, प्रांताधिकारी किंवा तहसिलदार यांना कळवाव्यात. या कामी कोणत्याही अधिकाऱ्याने कुचराई केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आदर्श ग्राम योजनेसाठी दोडामार्ग तालुक्यातील केर या गावाचा दोन कोटी 10 लक्ष रुपयांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या. जिल्ह्यातील गोपिनाथ मुंड शेतकरी अपघात विमा विषयीची प्रकरणे विमा कंपनेकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा कंपनीकडे करावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
यावेळी एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रम, आत्मा तसेच कृषि विभागाअंतर्गत येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा