You are currently viewing गुरूवंदना

गुरूवंदना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री प्रणिता खंडकर लिखित अप्रतिम गुरुवंदना*

 

*गुरूवंदना*

 

सर्व ज्ञात-अज्ञात गुरूंना विनम्र अभिवादन! 💐🙏

 

जीवनी क्षणोक्षणी, गुरू नवीन लाभती,

शिष्य – वृत्ती कायम, रे मना तू बाणवी!

माथा लीन राहू दे, झुकोनिया तयां पदी,

सदैव वंदनीय हे, गुरू सदाच जीवनी! ||१||

 

माय-तात हे गुरू, प्रथम लाभती जगी,

स्पर्श बोलती कधी, कधी लहानशी कृती,

संस्कारधन जोडूनी, तना-मनास घडविती,

सदैव वंदनीय हे, गुरू सदाच जीवनी! ||२ ||

 

शाळा, खेळ, पुस्तके , ज्ञान दालने नवी,

कला-विज्ञान-संस्कृती, मेळ योग्य घालूनी,

वात्सल्य आणि शासन,विद्यार्थी हे घडविती,

सदैव वंदनीय हे, गुरू सदाच जीवनी! ||३||

 

कार्यक्षेत्र ही विविध, संपर्क आणि सोबती,

मार्गदर्शक होऊनी, दिशा अचूक दाविती,

अनुभवाची जोड ही, प्रगल्भ या मना करी,

सदैव वंदनीय हे, गुरू सदाच जीवनी! ||४ ||

 

धर्म आणि कर्माची, विवेकनिष्ठ संगती,

जन्म आणि मृत्यूची,तोडण्यास साखळी,

प्रयोजन आयुष्याचे , सांगती विस्तारूनी,

सदैव वंदनीय हे, गुरू सदाच जीवनी!||५ ||

 

ज्ञान-कण प्राशूनी, सदा विनम्र राहूनी,

ज्ञात ते जगा करी, कर्तव्य हेच मानूनी,

हीच गुरूदक्षिणा, अपेक्षिली गुरूमनी,

सदैव वंदनीय हे, गुरू सदाच जीवनी! ||६||

 

©प्रणिता खंडकर.

डोंबिवली. जिल्हा. ठाणे.

संपर्क. 98334 79845.

प्रतिक्रिया व्यक्त करा