“नशामुक्त युवा फॉर विकसित भारत”
स्पर्धामध्ये युवक युवतींना सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या “माय भारत” उपक्रमांतर्गत जिल्ह्यात-“नशामुक्त युवा फॉर विकसित भारत” या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहचविण्यासोबतच युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धामध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक -युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या स्पर्धामध्ये सामुहिक लोकगीत, सामुहीक नृत्य, पथनाट्य, वैयक्तिक चित्रकला, लघुपट अथवा रील निर्मिती, घोषवाक्य लेखन, मौखिक काव्य सादरीकरण आणि वकृत्व स्पर्धा यांचा समावेश आहे. सर्व स्पर्धांचे विषय व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली, सामाजिक बांधिलकी आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका यावर अधारीत असतील.
युवकांमध्ये व्यासंमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे, सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करणे आणि विकसित भारत या राष्ट्रीय संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रीय सहभाग वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. कला, साहित्य आणि सृजनशील अभिव्यक्तीचा संदेश या उपक्रमातून केला जाणार
आहे. तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे. स्वयंसेवी संस्था तसेच १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक – युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे.
००००००
