गुरुपौर्णिमेनिमित्त सांगेली गुरगुट-सुतारटेंब मठात २९ जुलैला दर्शन सोहळा
ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्थेतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सावंतवाडी :
ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्था यांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प. पू. श्री संत सद्गुरू आनंदी गुरुजी यांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या सांगेली गुरगुट-सुतारटेंब मठ (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे संपन्न होणार आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता भक्तीगीत व भजनांनी कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता प. पू. श्री संत सद्गुरू आनंदी गुरुजी यांचे आगमन होणार असून, सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत शिष्यांकडून सद्गुरूंबद्दल मनोगत व्यक्त करण्यात येणार आहे. यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
या पवित्र दर्शन सोहळ्यास व गुरुपौर्णिमा उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
