You are currently viewing भगवान गौतम बुद्ध हेच खरे भारताचे सर्वश्रेष्ठ भूमिपुत्र : निलेश पवार

भगवान गौतम बुद्ध हेच खरे भारताचे सर्वश्रेष्ठ भूमिपुत्र : निलेश पवार

सावंतवाडी :

हजारों, लाखोंच्या यात्रा, जत्रा या परिवर्तनासाठी नसुन करमणुकीसाठी असतात. त्यामुळे वैचारिक परिवर्तनासाठी प्रशिक्षित मोजक्याच कार्यंकर्त्यांची गरज असुन हेच कार्यकर्ते आपल्या कृतीशील विचार व आचार यातूनच परिवर्तन घडवू शकतात. म्हणूनच भगवान गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी याचा सर्वप्रथम विचार मांडून त्यांनीच सर्वप्रथम प्रशिक्षित भिक्कू संघ निर्माण केला आणि या देशात सर्वप्रथम धम्म क्रांती केली. त्यामुळेच भगवान गौतम बुद्ध हेच खरे या देशातील सर्वश्रेष्ठ भूमिपुत्र आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते निलेश पवार यांनी सावंतवाडी येथे केले.

भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंती उत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात निलेश पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपिठावर बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस आर. जी. चौकीकर हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी निलेश पवार यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना, सूत्रपठण इत्यादी कार्यक्रम झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना निलेश पवार यांनी, भगवान गौतम बुद्ध यांनी मनाला प्रशिक्षित करण्यासाठी जगात सर्वप्रथम भिक्कू संघ प्रशिक्षित करून त्यातूनच पुढे मानवी संसाधनाचे महत्त्व निर्माण केल्याचे सांगून ध्येयवेढे मोजकेच प्रशिक्षित देशाचा विकास आणि विनास कशाप्रकारे घडवू शकतात याची उदाहरणे ही त्यांनी आपल्या उगवत्या शैलीत देऊन माणसाची उत्पत्ती ते उत्क्रांतीचा इतिहास स्पष्ट केला. माणसाच्या जन्मापासूनचा इतिहास उद्गत करीत शेवटी माणसाचे दुबळेपणावरही बोट त्यांनी ठेवले.
तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात लौकीक प्राप्त केला. मात्र त्यांनी म. फुले, भगवान बुध्द यांनाच गुरू का मानले, याचे सुंदर विवेचन करून भारतीय गणराज्य, भारतीय संस्कृती याबाबत निलेश पवार यांनी विवेचन केले. तसेच सध्या देशात भांडवलशाही व घराणेशाही कशी नांदत आहे, हे सांगून महिलेच्या चारित्र्याला जितकी किंमत आहे. त्याहीपेक्षा तुमच्या निवडणूकीत मतालाही किंमत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तुमचे मत ही लोकशाही वाचवू शकेल असे सांगून भगवान बुध्द यांचा विचारच या देशाला वाचवू शकेल हे त्यांनी स्पष्ट करून त्यांनी बुध्दांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जाधव यांनी, सूत्रसंचालन एम. एल. जाधव यांनी तर आभार चंद्रशेखर जाधव यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा